घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

मोदींच्या हातात देशाची सत्ता असो किंवा कुणाच्या हातात असो...जोपर्यंत आपण एक आहोत, तोपर्यंत बारामतीकरांना कुणी धक्का लावू शकत नाहीत असं शरद पवार म्हणाले.
शरद पवार
शरद पवारशरद पवार

बारामती : संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. राष्ट्रवादी पक्षातील उभ्या फूटीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान बारामतीत आज सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सांगता सभा पार पडली. या सभेत घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी भाषण केलं. त्यांच्या या भाषणाला बारामतीकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. देशाला नवी दिशा देण्याचं काम ही निवडणूक करेल असं शरद पवार म्हणाले.

बारामतीकडे संपूर्ण जगाचं लक्ष:

शरद पवार म्हणाले की, "गेली अनेक वर्ष आपण बारामतीत सांगता सभा घेत आलो आहे. ही शेवटची सभा गेली अनेक वर्षे आपण तिकडे घ्यायचो. पण सत्ताधारी मंडळींनी यावेळी आपल्याला ते ग्राऊंड मिळवून दिलं नाही. पण आज इथं तुम्ही बघताय, हजारोंची गर्दी पाहायला मिळत आहे."

"ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. सर्व जगाचं लक्ष आहे. अमेरिकेतनं पत्रकार इथं आलेत. या निवडणूकीत असे निकाल आपण देऊ की राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या सर्व जागा निवडून येतील. देशाला नवी दिशा देण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे, असं ते म्हणाले.

बारामतीकरांना कुणी धक्का लावू शकत नाही...

मोदींच्या हातात देशाची सत्ता असो किंवा कुणाच्या हातात असो...जोपर्यंत आपण एक आहोत, तोपर्यंत बारामतीकरांना कुणी धक्का लावू शकत नाही, असं शरद पवार म्हणाले. सुप्रिया सुळेंना पुन्हा निवडणूक देण्याचं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केलं.

बारामतीत पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार सामना:

बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येत्या मंगळवारी (7 मे) मतदान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी सायंकाळी पाच वाजता प्रचाराची सांगता होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानं इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत शरद पवार विरूद्ध अजित पवार असा सामना पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार गटासह महाविकास आघाडीनं तर सुनेत्रा पवारांसाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार ताकद लावल्याचं पाहायला मिळालं.

logo
marathi.freepressjournal.in