एकतर्फी प्रेमाचा हैवानपणा! १७ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीचे वार, गळ्यात फास बांधून छतावर लटकवण्याचा प्रयत्न, VIDEO

मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे लग्नास नकार दिल्याच्या रागातून १७ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. आरोपीने तिला गळफास देण्याचाही प्रयत्न केला असून घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एकतर्फी प्रेमाचा हैवानपणा! १७ वर्षीय मुलीवर कुऱ्हाडीचे वार, गळ्यात फास बांधून छतावर लटकवण्याचा प्रयत्न, VIDEO
Published on

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात लग्नास नकार दिल्याच्या रागातून १७ वर्षीय मुलीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बराच काळ मुलीचा पाठलाग करून तिला लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या तरुणाने घरात घुसून तिच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. एवढ्यावरच न थांबता तिचा गळफास देऊन मारण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी मुख्य आरोपी धर्मेंद्र परिहार (२२) आणि त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली असून आणखी तीन आरोपी फरार आहेत.

घरात घुसून केला हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र परिहार हा संबंधित मुलीला बराच काळ त्रास देत होता. तो तिच्यावर लग्नासाठी सतत दबाव टाकत होता. मात्र मुलीने त्याचा प्रस्ताव नाकारला होता.

शुक्रवारी मुलगी घरी एकटी असताना धर्मेंद्र घरात घुसला. त्याने कुऱ्हाडीने तिच्या डोक्यावर आणि मानेवर वार केले. जीव वाचवण्यासाठी मुलगी घराच्या छतावर धावत गेली. मात्र आरोपीने तेथेही तिचा पाठलाग करून ओढणीच्या सहाय्याने गळफास देण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकांना पाहताच आरोपी फरार

उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शर्मा यांनी सांगितले की, परिसरातील लोकांनी हा प्रकार पाहिल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. गळफासासाठी वापरलेली ओढणी तेथेच टाकून तो फरार झाला.

६० टाके, प्रकृती गंभीर

हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने ग्वाल्हेर येथे हलविण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा असून तिला तब्बल ६० टाके घालावे लागले आहेत. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

छतावरील घटनेचा व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, आरोपी धर्मेंद्र परिहार छतावर मुलीला ओढणीने गळफास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा कथित व्हिडीओ शनिवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

पाच जणांविरोधात गुन्हा

या प्रकरणी पोलिसांनी धर्मेंद्र परिहारसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपीची चौकशी सुरू असून फरार आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in