स्मृती-पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलला; प्रकृती बिघडल्याने स्मृतीचे वडील रुग्णालयात दाखल

स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती सकाळी अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.
स्मृती-पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलला; प्रकृती बिघडल्याने स्मृतीचे वडील रुग्णालयात दाखल
Published on

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा विवाहसोहळा रविवारी (दि.२३) सांगलीत पार पडणार होता. मात्र, अचानक तिच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने त्यांचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला. स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती सकाळी अचानक बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं.

वडिलांची प्रकृती स्थिर होईपर्यंत...

स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानंतर लग्नस्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. स्मृती मानधनाच्या कुटुंबातील जवळचे नातेवाईक तोहीन मिश्रा यांनी अधिकृत माहिती देताना सांगितलं की, “स्मृतीच्या वडिलांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होईपर्यंत विवाहसोहळा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.” तसेच त्यांनी सांगितले की, "सध्या श्रीनिवास मानधना डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी एकमताने विवाह पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे".

प्रकृतीच्या कारणामुळे सर्व कार्यक्रम रद्द

स्मृतीच्या कुटुंबीयांनी चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती केली की, “अफवा न पसरवता स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करा.” स्मृतीच्या टीममधील काही खेळाडू गेल्या दोन दिवसांपासून सांगलीत दाखल झाले होते. विवाहसोहळा दुपारी चार वाजता होणार होता. सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह काही मान्यवर या लग्नाला उपस्थित राहणार होते. मात्र, प्रकृतीच्या कारणामुळे सर्व कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले.

२०२४ मध्ये नात्याची अधिकृत घोषणा

२०१९ पासून स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या नात्याला सुरूवात झाली. २०२४ मध्ये नात्याची अधिकृत घोषणा करत पलाश मुच्छलने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये स्मृतीला प्रपोज केलं होतं. तो रोमँटिक क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. आता स्मृतीच्या वडिलांची तब्येत कधी ठीक होणार आणि हे क्युट कपल कधी लग्नबंधनात अडकणार, याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in