बलुचिस्तान: पाकिस्तानमध्ये अंतर्गत अस्थिरतेचे वादळ उसळले आहे. बलुचिस्तानमधील राष्ट्रवादी नेत्यांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची घोषणा करत मोठा राजकीय भूकंप घडवून आणला आहे. दशकांपासून पाकिस्तानकडून होणाऱ्या अन्याय, मानवी हक्कांचे उल्लंघन, अपहरण, बलात्कार, हत्या आणि स्थानिक संसाधनांचे शोषण याविरुद्ध आता बलुच जनतेने निर्णायक आवाज उठवला आहे.
प्रख्यात बलुच कार्यकर्ते आणि लेखक मीर यार बलुच यांनी सोशल मीडियावर स्पष्टपणे सांगितले की, "बलुच लोकांना 'पाकिस्तानी' संबोधू नये." त्यांनी भारत तसेच संयुक्त राष्ट्रसंघाला बलुचिस्तानला स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर 'स्वतंत्र बलुचिस्तान' ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, प्रस्तावित बलुच ध्वज आणि स्वतंत्र राष्ट्राच्या नकाशांचे चित्रे प्रसारित होत आहेत.
बलुचिस्तानमधील जनतेने रस्त्यावर उतरून "बलुचिस्तान पाकिस्तान नाही" अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली आहेत. मीर यार बलुच यांनी 'X' या प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की, "भारत आणि बलुचिस्तान या दोन महान संस्कृती पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद, कट्टरतावाद आणि हिंसाचाराच्या विरोधात एकत्र येत आहेत. बलुच देशभक्त आणि #YodhhaOfBharat भारत सरकार आणि लष्कराच्या पाठीशी ठामपणे उभे राहून इतिहास रचत आहेत. लवकरच भारताचा विजय आणि बलुचिस्तानचे स्वातंत्र्य साजरे केले जाईल."
तसेच त्यांनी भारताला विनंती करत म्हंटले, की ''प्रिय भारतीय देशभक्त मीडिया, यूट्यूबवरील सहकाऱ्यांना आणि भारताच्या रक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या विचारवंतांना विनम्र सल्ला देण्यात येतो की, कृपया बलुच जनतेला 'पाकिस्तानचे लोक' असे संबोधू नका. आम्ही पाकिस्तानी नाही; आम्ही बलुचिस्तानी आहोत.
पाकिस्तानचे खरे स्वतःचे लोक म्हणजे पाकिस्तानी पंजाबी आहेत, ज्यांच्यवर कधीही हवाई बॉम्बहल्ले, जबरदस्तीने अपहरण अथवा त्यांच्या सोबत हिंसा करण्यात आली नाही. बलुच लोक मात्र हे सर्व अत्याचार दशकानुदशके सहन करत आहेत.''
दरम्यान, बलुच लिबरेशन आर्मीने ‘ऑपरेशन हेरोफ २.०’ अंतर्गत पाकिस्तानच्या लष्करी व सरकारी ठिकाणांवर ७८ समन्वित हल्ले केल्याची माहिती दिली आहे. यामध्ये २४ तासांत ७ मोठे हल्ले करण्यात आले असून, परिणामी पाकिस्तानमध्ये अस्थिरता अधिक वाढली आहे.
पाकव्याप्त काश्मीर (पीओजेके) संदर्भात भारताने घेतलेल्या भूमिकेला देखील मीर यार बलुच यांनी ठाम पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी म्हटले, "१४ मे २०२५ रोजी भारताने पाकिस्तानला पीओके रिकामा करण्यास सांगितल्याच्या निर्णयाला बलुचिस्तान पूर्ण पाठिंबा देतो. आंतरराष्ट्रीय समुदायानेही पाकिस्तानवर दबाव आणून पीओके सोडण्यास भाग पाडले पाहिजे. अन्यथा, पाकिस्तानचे लष्करी जनरलच भावी रक्तपातास जबाबदार ठरतील."
बलुचिस्तानचा ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमी -
बलुचिस्तान हा नैऋत्य आशियातील एक भौगोलिक व सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश आहे. सध्या तो पाकिस्तान, इराण आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये विभागलेला आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान हा प्रांत क्षेत्रफळाने सर्वात मोठा असूनही अत्यंत दुर्लक्षित व मागासलेला आहे. येथील बलुच लोकांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी १९४८ पासून सुरू आहे. १९४७ साली कलात रियासतीने काही काळासाठी स्वतंत्रता जाहीर केली होती, परंतु पाकिस्तानने १९४८ मध्ये बळाच्या जोरावर तो प्रदेश आपल्या ताब्यात घेतला. त्यामुळे बलुच लोक या कृतीला अन्यायकारक समजत असून पाकिस्तानला आपला देश मानत नाहीत.
बलुचिस्तान नैसर्गिक संपत्तीने समृद्ध असून, येथे प्रचंड प्रमाणात नैसर्गिक वायू, कोळसा, तांबे, सोनं आणि इतर महत्त्वाची खनिजे आहेत. परंतु, पाकिस्तान सरकारने या संसाधनांचा विकासासाठी वापर न करता स्थानिक जनतेवर अन्याय, लुटमार, अत्याचार आणि दडपशाहीचा मार्ग स्वीकारला. महिलांवर अत्याचार, अपहरण आणि मानवी हक्कांचे सातत्याने उल्लंघन हे येथील वास्तव बनले आहे.
या पार्श्वभूमीवर, भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' हल्ल्याने बलुचिस्तानमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, स्वातंत्र्यासाठीचा मार्ग आता अधिक स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे.