
महाकुंभमधील मृतांची संख्या ३० वर पोहोचली असून त्यापैकी २५ जणांची ओळख पटली आहे. अन्य पाच जणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी महाकुंभ मेळ्यातील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. आपल्या जवळच्यांबद्दलच्या माहितीसाठी, बेपत्ता झालेल्यांसाठी १९२० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मृतांपैकी ४ जण कर्नाटकचे, एक जण आसामचा आणि एक जण गुजरातचा असल्याची माहिती कुंभमेळ्याचे डीआयजी (उपमहानिरीक्षक) वैभव कृष्णा यांनी दिली. जखमींना शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींना मेडिकल कॉलेजमध्येही दाखल करण्यात आले आहे.
प्रचंड गर्दीमुळे बॅरिकेडस तुटून चिरडले गेले भाविक
मौनी अमावस्येच्या ब्रह्म मुहूर्ताच्यावेळी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. कुंभमेळा परिसरात प्रचंड गर्दीमुळे आखाडा रस्त्यावरील अनेक बॅरिकेड्स तुटले. दुसऱ्या बाजूला लोक आंघोळीसाठी बसले होते, त्यांना जमावाने, अचानक आलेल्या गर्दीने चिरडायला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळपास ९० जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने त्यातील ३० भाविकांचा मृत्यू झाला. काही जखमींना घरी पाठवण्यात आले आहे.
योगी आदित्यनाथ म्हणाले, “संगम घाटावर मोठ्या प्रमाणात भाविक एकत्र आल्याने चेंगराचेंगरी झाली. पण घटनास्थळी प्रशासन सज्ज आहे. रात्री १ ते दोन वाजताच्या सुमारास आखाडा मार्गावर अमृत स्नानासाठी भाविक जमले होते. तेथे बॅरिकेडस् लावण्यात आले होते. बॅरिकेडस् निघाल्याने भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासन सातत्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. संगम घाटातील घटनेनंतर या दुर्घटनेची माहिती घेण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत चार वेळा फोन केला असून देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी नड्डा यांनीही संपर्क साधला आहे. तसेच, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही घटनेची माहिती घेतली.”
मौनी अमावस्येनिमित्त त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जवळपास ५७.१ दशलक्ष लोक जमले होते, अशी आकडेवारी उत्तर प्रदेश प्रशासनाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संपर्क साधून प्रयागराज येथील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच तातडीने मदत कार्य राबवण्याचे आवाहन केले. प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गर्दी नियंत्रणासाठी ‘आरएएफ’ तैनात करण्यात आले आहे.
पुढचे काही दिवस अयोध्येत न येण्याचे आवाहन
महाकुंभात मौनी अमावस्येमुळे प्रयागराज मध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र, त्याचा परिणाम केवळ प्रयागराज मध्येच झाला नाही तर इतर अनेक तीर्थक्षेत्रांवरही दिसून येत आहे. अयोध्या, काशी आणि इतर अनेक ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून आली आहे. लोक अयोध्येच्या शरयू नदीवर आणि बनारसच्या घाटावर श्रद्धेने स्नान करण्यासाठी येत आहेत. राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे महासचिव चंपत राय यांनी आजूबाजूच्या भाविकांना पुढील काही दिवस अयोध्यामध्ये न येण्याचे आवाहन केले आहे.
अमृत स्नान रद्द
महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर आखाड्यांचे अमृत स्नान रद्द करण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या आवाहनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रमुख १३ अखाड्यांनी बुधवारच्या मौनी अमावस्येनिमित्तचे अमृतस्नान रद्द केले आहे. मौनी अमावास्येला सर्व आखाड्यातील साधू-संत शाही स्नान करत असतात. यावेळी भाविकांच्या सोयीसाठी आखाड्यांना पहाटे ४ वाजल्यापासून शाही स्नानासाठी निघावे लागले आणि ५ वाजेआधीच स्नान सुरू करावे लागले. आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी म्हणाले की, “लोकांची गर्दी लक्षात घेता, अमृत स्नान रद्द करण्यात आले आहे. पुढच्या वसंत पंचमीला शाही स्नान करण्यात येईल.” मात्र चेंगराचेंगरीनंतरही दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ४ कोटी २४ लाख भाविकांनी अमृतस्नान केल्याची माहिती प्रशासनाने दिली.
न्यायालयीन चौकशीचे आदेश
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तीन सदस्यीय समिती या घटनेची चौकशी करणार आहे.
मृतांच्या कुटुंबियांना २५ लाखांची मदत
महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्यू पावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. तसेच जखमींवरील उपचारासाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल, असे राज्य सरकारने जाहीर केले.
प्रयागराज येथील महाकुंभात झालेला अपघात दु:खद आहे. यामध्ये ज्या भाविकांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे. यासोबतच, सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी मी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री योगीजींशी बोललो आहे आणि मी सतत राज्य सरकारच्या संपर्कात आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
प्रयागराज महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि असंख्य लोक जखमी झाल्याचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती तातडीने सुधारावी, अशी आशा व्यक्त करतो. या दुःखद घटनेसाठी चुकीची व्यवस्था, व्यवस्थेतील उणीवा आणि सर्वसामान्य भाविकांऐवजी व्हीआयपींकडे जास्त लक्ष देणे, या गोष्टी जबाबदार आहेत. अजून महाकुंभ मेळ्याचा भरपूर वेळ बाकी आहे. आणखी महास्नान व्हायचे आहेत. आज घडली तशी घटना पुढे होऊ नये, यासाठी सरकारने व्यवस्था सुधारायला हवी.
- राहुल गांधी, विरोधी पक्षनेते
प्रयागराजमधील परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे, पण गर्दी अजूनही खूप जास्त आहे. संतांसोबत सुद्धा चर्चा झाली आहे. भाविकांना व्यवस्थित स्नान करता यावे, म्हणून मोठी बैठक आयोजित केली जात आहे. भाविकांनी अफवांकडे लक्ष देऊ नये. केंद्र आणि राज्य सरकार पूर्ण ताकदीने सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
- योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री