केरळमधील हत्तींच्या संख्येत सातत्याने घट; अवघे ४४८ हत्ती शिल्लक

१४ जुलै रोजी मंगलमकुन्नु केशवन नामक हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर आता हत्तींच्या मृत्यूंबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे
केरळमधील हत्तींच्या संख्येत सातत्याने घट; अवघे ४४८ हत्ती शिल्लक

देशभरातील पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत होणारी घट ही चिंतेची बाब असतानाच आता केरळमधील हत्तींच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केरळमधील हत्तींवर होत असलेल्या अन्यायामुळे संख्या घटण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. २००८मध्ये जवळपास ९०० हत्ती असताना आता हा आकडा तब्बल ५० टक्क्यांनी घटला आहे. केरळात आता अवघे ४४८ हत्ती शिल्लक असून, गेल्या पाच वर्षांत तब्बल ११५ बंदी हत्तींचा मृत्यू झाला आहे.

१४ जुलै रोजी मंगलमकुन्नु केशवन नामक हत्तीचा मृत्यू झाल्यानंतर आता हत्तींच्या मृत्यूंबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या हत्तीला फिटनेस प्रमाणपत्राशिवाय परेडमध्ये सहभागी करवून घेण्यात आले होते, असा अहवाल एलिफंट टास्क फोर्सने दिला आहे. त्यामुळेच हेरिटेज अॅनिमल टास्क फोर्सचे सचिव व्ही. के. व्यंकटचलम यांनी ताब्यातील हत्तींविरोधातील क्रौर्यात सातत्याने वाढ होत असल्याचा आरोप केला आहे.

उत्सवावेळी हत्ती परराज्यातून मागवा

उत्सवादरम्यान केरळमध्ये हत्तींना मोठे स्थान असते. मिरवणुका, परेड यासाठी हत्तींवरून मिरवणुका काढण्यात येतात. त्यातच आता हत्तींच्या रोडावलेल्या संख्येमुळे परराज्यातून हत्ती मागवण्याची मागणी पुढे आली आहे. उत्सवावेळी परेडसाठी बाहेरून हत्ती मागवण्यासाठी नियमांत सूट देण्याची मागणी केरळ एलिफंट ओनर्स फेडरेशनने केली आहे; मात्र परराज्यातील हत्तींसोबतही गैरवर्तन करण्यात येईल, या भीतीने प्राणी अधिकार कार्यकर्ते व्यंकटचलम यांनी बाहेरून हत्ती मागवण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

दरवर्षी २५ बंदीवान हत्तींचा मृत्यू

गेल्या काही वर्षांतील बंदिस्त हत्तींच्या मृत्यूची आकडेवारी धक्कादायक आहे. गेल्या पाच वर्षांत ११५ म्हणजेच दर वर्षाला जवळपास २५ हत्ती मृत्युमुखी पडत आहेत. केरळ वनविभागाने मात्र या हत्तींच्या मृत्यूला त्यांच्या मालकांना जबाबदार धरले आहे. बंदीवान हत्तींच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण त्यांच्या मालकांची खराब वागणूक आहे, असे केरळ वनविभागाचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in