कानपूर : २१ वर्षीय तरूणीवर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; अक्षरश: गाल फाटला, १७ टाके पडले

देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असतानाच कानपूरमध्ये एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
stray-dog-attack-kanpur-girl-21-year-old-injured
Published on

देशभरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होत असतानाच उत्तर प्रदेशात कानपूरमध्ये एका तरुणीवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाने नुकताच भटक्या कुत्र्यांना लसीकरण करूनच रस्त्यावर सोडण्याचा आदेश दिला आहे. काही दिवसांपूर्वी श्वानप्रेमीनी कुत्र्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले होते. तर, दुसरीकडे भटक्या कुत्र्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना सोशल मीडियावर पाहण्यात येत आहेत. अशीच एक जीवघेणी घटना कानपूर येथे घडली. एका २१ वर्षीय तरूणीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. तिच्या गालाचा त्यांनी चावा घेऊन अक्षरश: तिचा गाल फाटला आहे. यामुळे ''आता श्वानप्रेमी कुठे गेले?'' असा संतप्त सवाल नेटकरी करत आहेत.

ही घटना कानपूरमधील शान नगर परिसरात २० ऑगस्ट रोजी घडली. २१ वर्षीय वैष्णवी साहू बीबीएच्या अंतिम वर्षात शिकत आहे. ती कॉलेजमधून घरी परतत असताना परिसरात भटके कुत्रे आणि माकडांमध्ये संघर्ष सुरू होता. त्याच वेळी तीन भटके कुत्रे अचानक वैष्णवीवर झेपावले आणि तिच्यावर हल्ला केला. त्यांनी तिच्या गालाचा चावा घेत तुकडाच पाडला. तिच्या नाकावरही जखमा केल्या. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तिचा पाठलाग करून कुत्र्यांनी तिला जखमी केले.

स्थानिकांनी आरडाओरडा ऐकून काठ्या घेऊन कुत्र्यांना पळवून लावले, पण तोपर्यंत वैष्णवी गंभीर जखमी झाली होती. रक्तबंबाळ अवस्थेत तिला तातडीने कांशीराम रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांना तिच्या गालावर तब्बल १७ टाके घालावे लागले. सध्या ती फक्त द्रव पदार्थ घेऊ शकते, कारण तोंड हलवणे तिच्यासाठी अशक्य झाले आहे.

वैष्णवीचे काका आशुतोष यांनी सांगितले की, तिचे वडील हयात नाहीत आणि ती मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण करत आहे. अशा घटनेमुळे तिच्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, या घटनेवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. "प्राणीमित्र सर्वोच्च न्यायालयापर्यंत आवाज पोहोचवतात, पण सामान्य लोक रस्त्यावर भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला बळी पडतात, त्यांचे काय?" असा सवाल नागरिक विचारत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in