

देशाला हादरवून सोडणाऱ्या निठारी हत्याकांड प्रकरणात मोठा निर्णय समोर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरोपी सुरेंद्र कोलीची क्युरेटिव्ह याचिका मंजूर करत, शेवटच्या प्रकरणातील दोषारोपही रद्द केले आहेत. त्यामुळे १७ वर्षांनंतर कोलीच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने म्हटले, की "त्याला तात्काळ तुरुंगातून सोडण्यात यावे."
७ ऑक्टोबर रोजी क्युरेटिव्ह याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले होते की, कोलीला दोषी ठरवणे केवळ एका साक्षीदाराच्या जबाबावर आणि स्वयंपाकघरातून जप्त केलेल्या चाकूवर आधारित होते. उर्वरित १२ प्रकरणांमध्ये तो निर्दोष मुक्त झाला असताना एकाच प्रकरणात शिक्षा कायम ठेवणे विसंगत आणि न्यायविरुद्ध आहे.
तात्काळ सोडण्याचे आदेश
याच भूमिकेवर अंतिम आदेश देत, मुख्य न्यायाधीश बी.आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने कोलीला सर्व आरोपांतून मुक्त केले. “याचिकाकर्त्याला आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. त्याला तात्काळ सोडण्यात यावे, असे आदेश न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी दिले.
निठारी हत्याकांड - भयावह हत्येची मालिका
नोएडातील निठारी गावातील कोठी क्रमांक डी - ५ मधून मानवी सांगाडे, अवयवांचे तुकडे आणि अवशेष मिळू लागले, तेव्हा या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. चौकशीत अल्पवयीन मुली आणि मुलांना घरात ओढून नेणे, अत्याचार करणे, हत्या करणे आणि मृतदेहाचे तुकडे करून नाल्यात टाकणे अशी विकृत मालिका उघडकीस आली होती. या कोठीत व्यवसायिक मोनिंदर सिंह पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली राहत होते.
पायलमुळे प्रकरणाचा उलगडा
७ मे २००६ रोजी पायल नावाची मुलगी पंढेरच्या कोठीबाहेर रिक्षाने आली. पैसे सुट्टे नाहीत म्हणून लगेच येते सांगत ती कोठीत गेली. बराच वेळ ती बाहेर आली नाही. म्हणून रिक्षाचालकाने कोठीत जाऊन विचारणा केल्यावर पंढेरने ती केव्हाच गेली असे सांगितले. पण, मी तिला बाहेर येताना पाहिलेच नाही यावर रिक्षाचालक ठाम होता. काही वेळाने समजले पायल बेपत्ता झाली आहे. पायलच्या वडिलांनी FIR दाखल केली. तपासात लक्षात आले की निठारी परिसरातून १२ हून अधिक मुलं बेपत्ता झाली होती. मोबाईल कॉल रेकॉर्ड, साक्षीदारांचे जबाब आणि परिसरातील लोकांच्या माहितीवरून कोठीवर छापा टाकण्यात आला आणि कोली व पंढेरला अटक झाली. यानंतर निठारीचे हे थरकाप उडवणारे हत्याकांड देशासमोर आले. या प्रकरणाने मनुष्यहत्येच्या पलीकडे नरभक्षण, लैंगिक विकृती आणि संगनमत यांसारख्या भयानक बाबींचा उलगडा झाला.
१२ प्रकरणांत निर्दोष
त्यानंतर मोनिंदर सिंह पंढेर आणि सुरेंद्र कोलीला अटक करण्यात आली. यादरम्यान पंढेरवरील आरोप सिद्ध न झाल्याने त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले. पण, सुरेंद्र कोलीवर एकूण १३ खटले दाखल झाले होते. त्यापैकी १२ प्रकरणांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी त्याची निर्दोष सुटका केली. मात्र एक प्रकरण प्रलंबित होते, ज्यात त्याची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती.
भयावह हत्या केल्या कोणी?
आता या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले, “जर १२ प्रकरणांत तथ्यांवर आधारित निर्दोष मुक्तता झाली असेल, तर एका प्रकरणात शिक्षेचा कायमस्वरूपी निर्णय ठेवणे न्यायसंगत ठरत नाही.” यामुळे आता त्या एकमेव प्रकरणातही कोलीच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जर पंढेर आणि कोली दोघेही निर्दोष असतील तर शेवटी इतक्या भयावह हत्या केल्या कोणी? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.