दिल्ली विमानतळावर अपघात; स्विस फ्लाइटच्या इंजिनला आग, ६ प्रवासी जखमी, Video

एअरबस A330 हे विमान रविवारी पहाटे १.०८ वाजता रनवेवर वेग घेत असतानाच एका इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर आग लागली.
दिल्ली विमानतळावर अपघात; स्विस फ्लाइटच्या इंजिनला आग, ६ प्रवासी जखमी, Video
दिल्ली विमानतळावर अपघात; स्विस फ्लाइटच्या इंजिनला आग, ६ प्रवासी जखमी, Video
Published on

दिल्ली विमानतळावर रविवारी (दि.२६) पहाटे मोठी दुर्घटना टळली. झुरिचकडे जाणाऱ्या स्विस (SWISS) एअरच्या विमानाच्या इंजिनाला टेकऑफदरम्यान अचानक आग लागल्याने उड्डाण तातडीने थांबवले. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टेकऑफदरम्यान इंजिनमध्ये बिघाड होऊन आग

माहितीनुसार, SWISS एअरचे LX147 हे विमान दिल्लीहून स्वित्झर्लंडमधील झुरिचकडे रवाना होणार होते. एअरबस A330 हे विमान रविवारी पहाटे १.०८ वाजता रनवेवर वेग घेत असतानाच एका इंजिनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर आग लागली. परिस्थिती ओळखून वैमानिकांनी तात्काळ उड्डाण रद्द केले.

रनवेवरच आपत्कालीन सुटका

घटनेनंतर विमानातील सर्व प्रवाशांना रनवेवरच आपत्कालीन स्लाइडच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. काही प्रवाशांना स्लाइड वापरणे शक्य नसल्याने त्यांच्यासाठी जिन्याचीही व्यवस्था करण्यात आली. एअरलाइनने दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण प्रक्रिया खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आली.

६ प्रवासी जखमी, रुग्णालयात उपचार

या आपत्कालीन सुटकेदरम्यान सहा प्रवासी जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एअरलाइनने स्पष्ट केले की, सर्व क्रू मेंबर सुरक्षित असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

विमानात २२८ प्रवासी

SWISS एअरच्या माहितीनुसार, HB-JHK नोंदणी असलेल्या या विमानात २२८ प्रवासी, ४ नवजात बालके आणि क्रू मेंबर होते. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांची काळजी स्थानिक पथकांकडून घेतली जात आहे.

प्रवाशांसाठी हॉटेल आणि नव्या बुकिंगची व्यवस्था

या घटनेनंतर अडकलेल्या प्रवाशांसाठी SWISS एअरकडून पर्यायी बुकिंग, पुढील प्रवासाची व्यवस्था आणि हॉटेल निवासाची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांशी सातत्याने संपर्क राहावा यासाठी त्यांना विशेष संपर्क कार्ड देण्यात आले आहेत.

SWISS कडून विशेष पथक, चौकशी सुरू

या घटनेनंतर SWISS एअरने विशेष टास्क फोर्स स्थापन केली आहे. कंपनीचे तांत्रिक तज्ज्ञ दिल्लीला येऊन विमानाची तपासणी करणार आहेत. "या घटनेमागचे नेमके कारण शोधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे," असे एअरलाइनने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in