

नवी दिल्ली : भारतात प्रौढ आणि मुलांसाठी क्षयरोगावरील (टीबी) दोन नवीन लसी सुरक्षित असल्या तरी, त्या या संसर्गजन्य आजाराच्या सर्व प्रकारांपासून संरक्षण देऊ शकत नाहीत, असे ‘द ब्रिटिश मेडिकल जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या निकालात म्हटले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) संशोधकांनी ‘व्हीपीएम १००२’ आणि ‘इम्युवॅक’ या दोन नवीन लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी ‘प्रीव्हेंट टीबी’ चाचणी घेतली होती. भारतात सध्या बालकांना जन्मानंतर दिली जाणारी ‘बीसीजी’ लस लहान मुलांमधील गंभीर क्षयरोगावर प्रभावी आहे, मात्र ती किशोरवयीन मुले आणि प्रौढांना संरक्षण देत नाही, असे संशोधकांनी नमूद केले आहे.
‘व्हीपीएम १००२’ ही जर्मनीतील ‘सीरम लाइफ सायन्स युरोप जीएमबीएच’ने विकसित केलेली रिकॉम्बिनंट लस आहे, तर 'इम्युवॅक' ही ‘आयसीएमआर’ आणि अहमदाबादच्या ‘कॅडिला फार्मास्युटिकल्स’ने विकसित केलेली इनॅक्टिव्हेटेड लस आहे. जुलै २०१९ ते डिसेंबर २०२० दरम्यान दिल्ली, महाराष्ट्र आणि तमिळनाडूसह सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १८ ठिकाणच्या १२,७०० हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. या सहभागींना ३८ महिने देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. या दोन्ही लसी सुरक्षित असल्याचे आणि त्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवल्याचे दिसून आले असले तरी, सर्व प्रकारच्या 'मायक्रोबायोलॉजिकली कन्फर्म' क्षयरोग किंवा फुफ्फुसाच्या क्षयरोगावर त्यांची परिणामकारकता दिसून आली नाही.
‘व्हीपीएम १००२’ लसीने सर्व वयोगटातील ‘एक्स्ट्रापल्मोनरी टीबी’विरुद्ध ५०.४ टक्के परिणामकारकता दाखवली आहे. हा प्रकार प्राणघातक आहे.
यांच्यावर लसीचा परिणाम नाही
वजन कमी असलेल्या मुले आणि प्रौढांमध्ये दोन्ही लसी प्रभावी ठरल्या नाहीत, त्यामुळे लसीकरणासोबतच पोषण आहाराचीही गरज असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.