
तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील पाशमैलाराम औद्योगिक क्षेत्रातील सिगाची इंडस्ट्रीज या फार्मा कंपनीच्या प्लांटमध्ये सोमवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून ३४ कामगार जखमी झाले आहेत. स्फोटानंतर प्लांटमध्ये भीषण आग लागली होती, जी काही तासांत नियंत्रणात आणण्यात आली.
हा स्फोट सकाळी ९.२८ ते ९.३५ या वेळेत प्लांटच्या ड्रायिंग युनिटमध्ये झाल्याची माहिती आहे. स्फोटाचे प्राथमिक कारण केमिकल प्रक्रियेमुळे दबाव वाढल्याचे सांगितले जात आहे. स्फोट होताच अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी तात्काळ दाखल होत NDRF टीमने शोध आणि बचावकार्य हाती घेतले.
स्फोटावेळी प्लांटमध्ये सुमारे १५० कामगार उपस्थित होते, त्यातील ९० कामगार त्या विशिष्ट विभागात काम करत होते जिथे स्फोट झाला. आतापर्यंत ३ मृतदेहांची ओळख पटली असून ६ मृतदेह इतके जळाले आहेत की ओळख पटवणं कठीण आहे. त्यामुळे त्यांची ओळख डीएनए तपासणीद्वारे केली जाणार आहे. तर आणखी ३ मृतदेह मलब्यात अडकलेले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळी अग्निशामक दलाच्या १० गाड्या, तसेच NDRF व SDRF च्या पथकांनी मोठ्या प्रमाणावर बचावकार्य हाती घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ''प्लांटमधील मजुरांच्या हजेरीचा तपशील नोंदवणारी व्यक्तीही मृत्यूमुखी पडली असण्याची शक्यता आहे, त्यामुळे उपस्थित मजुरांची नेमकी संख्या ठरवणं सध्या कठीण आहे.''
सिगाची इंडस्ट्रीज लिमिटेड ही फार्मास्युटिकल कंपनी असून अॅक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रेडिएंट्स (APIs), इंटरमिजिएट्स, व्हिटॅमिन-मिनरल मिश्रण आणि इतर औषधनिर्मिती सेवांमध्ये काम करते. दरम्यान, कंपनीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री दामोदर राजा नरसिंहा आणि कामगार मंत्री जी विवेक वेंकटस्वामी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाइकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.