तमिळनाडूत थलपतीचा ऐतिहासिक 'विजय'

आतापर्यंत तमिळनाडूसह देश विदेशातील चाहत्यांच्या हदयावर राज्य करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय आणि त्याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत अख्खे तमिळनाडू ताब्यात घेण्याचा भीम पराक्रम केला आहे.
तमिळनाडूत थलपतीचा ऐतिहासिक 'विजय'
तमिळनाडूत थलपतीचा ऐतिहासिक 'विजय'X
Published on

चेन्नई : आतापर्यंत तमिळनाडूसह देश विदेशातील चाहत्यांच्या हदयावर राज्य करणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय आणि त्याच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) पक्षाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत अख्खे तमिळनाडू ताब्यात घेण्याचा भीम पराक्रम केला आहे. केवळ दीड वर्षांपूर्वी स्थापन झालेला हा पक्ष निवडणुकीत खूप काही यश मिळवेल याबाबत शंका कुशंका व्यक्त केली जात होती. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनाही पराभूत करून सत्ताधारी डीएमके पक्षाला अस्मान दाखवले आहे. थलपती विजय त्रिचुरापल्ली मतदारसंघातून २७ हजार मतांनी तर पेराबूर मतदारसंघातून ५७ हजार मतांनी विजयी झाला आहे. अभिनेता विजय याचा पक्ष २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत एवढी मोठी मुसंडी मारेल याचा अंदाज वर्तवणे कुणालाही अशक्य होते.

घोषणा ठरल्या गेमचेंजर्स

विजयच्या हातात तमिळनाडू राज्याची धुरा देण्यासाठी टीव्हीकेच्या काही महत्त्वाच्या घोषणा गेमचेंजर्स ठरल्या आहेत. यात लाडक्या बहिणींना २५०० रुपये, शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी, पदवीधर बेरोजगारांना महिन्याला ४ हजार तर डिप्लोमा झालेल्या तरुणांना २५०० रुपये भत्ता, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपसाठी ५ हजार ते ८ हजार रुपयांचे विद्यावेतन, ५ लाख तरुणांना १८ हजार रुपयांची रोजगार संबंधित सहाय्यता योजना, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी २० लाख रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज, वर्षाला ५ एलपीजी सिलिंडर मोफत, ५ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील वधूंना लग्नासाठी ८ ग्रॅम सोने आणि सिल्क साडी, सरकारी शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत, एआयवर आधारित मोफत कोचिंग सेंटर अशा लक्षवेधी घोषणा दिल्या होत्या.

प्रशांत किशोर यांनी केली होती भविष्यवाणी

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी एक वर्षभरापूर्वी वर्तवलेली भविष्यवाणी आता व्हायरल होत आहे. त्यांनी मार्च २०२४ मध्ये एका मुलाखतीत ठामपणे सांगितले होते की, जर विजय स्वबळावर लढले तर ते तमिळनाडू जिंकण्याची दाट शक्यता आहे. बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या ११७ पेक्षा जास्त जागा जिंकण्याची क्षमता त्यांच्यात आहे. दरम्यान, किशोर यांची ‘आय पॅक’ ही संस्था विजय यांच्या पक्षासाठी पडद्यामागून काम करत असल्याचे म्हटले जात आहे.

प्रस्थापितांना धक्का

दाक्षिणात्य राज्यांमध्ये भाषिक अस्मितेसह इतर स्थानिक मुद्दे महत्त्वाचे असतात. त्या आधारेच निवडणुकीचा कल आधीच समजतो. तमिळनाडूत गेल्या अनेक दशकांपासून द्रविडी राजकारणात दोन मोठे पक्ष मांड टाकून होते. मात्र, यावेळी जनतेने प्रस्थापित राजकारणाला छेद देत विजयच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. विजय यांच्या या झंझावाताने केवळ स्टॅलिन यांनाच धक्का दिला नाही, तर भाजप आणि एआयएडीएमकेसारख्या पक्षांनाही धक्का बसला आहे.

काँग्रेसला आघाडीसाठी आमंत्रण

विजयाच्या पार्श्वभूमीवर, थलपती विजयचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसला टीव्हीकेसोबत आघाडी करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. अन्य पक्षांना पाठिंबा देऊन काँग्रेसने आपली ताकद कमी केली आहे. आता त्यांच्याकडे स्वत:ला बळकट करण्याची संधी असल्याचे चंद्रशेखर यांनी म्हटले आहे. दरम्यान, द्रमुकचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला ४ जागांवर आघाडी आहे.

ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार

थलपती विजयकडे प्रदीर्घकाळ काम करत असलेले ड्रायव्हर राजेंद्रन यांचा मुलगा सबरीनाथन या निवडणुकीत विरुगमपक्कम मतदारसंघातून विजयी झाला आहे. विजयने त्याच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी मंचावर बोलावून तिकीट दिले होते. तिकीट मिळाल्यावर भावनिक झालेल्या शबरीनाथन रडत विजयला मिठी मारली होती. त्यावेळी तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in