थलपती विजय : चित्रपटाचा पडदा ते राजकारण- ब्लॉकबस्टर यश

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील महासुपरस्टार जोसेफ विजय चंद्रशेखर, जो जगभरात 'थलपती' विजय म्हणून ओळखला जातो, आता तमिळनाडूच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा बनला आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याने आपल्या 'तमिळगा वेत्री कळघम' या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करून सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
थलपती विजय : चित्रपटाचा पडदा ते राजकारण- ब्लॉकबस्टर यश
Published on

तमिळनाडू : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील महासुपरस्टार जोसेफ विजय चंद्रशेखर, जो जगभरात 'थलपती' विजय म्हणून ओळखला जातो, आता तमिळनाडूच्या राजकारणातील एक प्रमुख चेहरा बनला आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी त्याने आपल्या 'तमिळगा वेत्री कळघम' या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करून सक्रिय राजकारणात प्रवेश केला.

विजयचा जन्म २२ जून १९७४ रोजी चेन्नई येथे झाला. त्याचे वडील एस.ए. चंद्रशेखर प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आहेत. विजयने १९८४ मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्राला सुरुवात केली आणि १९९२ च्या 'नालैया थीरपू' चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. 'घिल्ली', 'पोक्किरी', 'मर्सल' आणि 'लिओ' यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे तो दक्षिण भारतासह जगभरात लोकप्रिय झाला.

गेल्या अनेक वर्षांपासून विजयआपल्या 'विजय मक्कल इयक्कम' या फॅन क्लबच्या माध्यमातून समाजसेवा करत होता. मात्र, २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्याने टीव्हीके या पक्षाची स्थापना केली.

विजयचा पक्ष धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि समता या तत्त्वांवर आधारित आहे. त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार आणि के. कामराज यांच्या विचारांना आपली विचारधारा मानले आहे. भाजप हा आपला वैचारिक विरोधक तर द्रमुक आपला राजकीय विरोधक आहे असे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.

विजयची प्रतिमा एक शांत, संयमी पण धाडसी नेता म्हणून आहे. "कमी शब्दांत जास्त अर्थ" सांगणारी त्याची भाषणे तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत. चित्रपटसृष्टीतील यशानंतर आता तो जनसेवेसाठी पूर्णवेळ राजकारणात उतरला असून, तमिळनाडूच्या भावी राजकारणात तो एक निर्णायक शक्ती म्हणून उदयास आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in