तमिळनाडूत पेच कायम; पश्चिम बंगाल विधानसभा बरखास्त

तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. थलापती विजय यांचा ‘टीव्हीके’ पक्ष सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमत मात्र मिळालेले नाही.
तमिळनाडूत पेच कायम; पश्चिम बंगाल विधानसभा बरखास्त
तमिळनाडूत पेच कायम; पश्चिम बंगाल विधानसभा बरखास्त
Published on

चेन्नई : तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. थलापती विजय यांचा ‘टीव्हीके’ पक्ष सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरला असला, तरी बहुमत मात्र मिळालेले नाही. त्यामुळे राज्यपालांकडून अद्याप हिरवा कंदील दिला गेलेला नाही. ‘सरकार स्थापन करण्यासाठी लागणारे बहुमत कुठून आणणार, तुम्हाला कोणकोणत्या पक्षांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला आहे?, असे प्रश्न तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांना यावेळी विचारले. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर विजय यांनी राज्यपालांची दुसऱ्यांदा भेट घेतली. मात्र, राज्यपालांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने सत्ता स्थापनेला विलंब होण्याचीच चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, विजय यांचा पक्ष सर्वाधिक जागा मिळवणारा असल्याने त्याला सरकार बनवण्यासाठी पाचारण करायला हवे असे मत कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करायला सांगायला हवे असे त्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे टीव्हीके कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढत असून आज त्यांनी चेन्नईमध्ये निदर्शने केली, टीव्हीकेचे १०८ आमदार निवडून आले आहेत. विजय यांनी एका मतदारसंघातून राजीनामा दिला, तर ही संख्या १०७ इतकी होईल. काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे पाच आमदार आहेत. त्यामुळे हा आकडा ११२ इतका होईल. तरीही टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी अजून ६ आमदारांची गरज आहे.

विजय यांनी सीपीआय (मार्क्सवादी) पक्षालाही पत्र पाठवून पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. या पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यांनी पाठिंबा दिल्यानंतरही आणखी चार आमदारांची गरज असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे स्थिर सरकारसाठी काठावरील बहुमत धोक्याचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in