
लखनऊ : प्रत्येक मशिदीखाली मंदिर असल्याचा दावा करून कसे चालणार, कोणत्याही प्रार्थनास्थळांखाली हिंदू मंदिरे असण्याचा दावा करणे स्वीकारार्ह नसल्याचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले होते. त्यांच्या याचा विधानाचा दाखल देत शंकराचार्यांनी मोहन भागवतांवर टीकास्त्र सोडताना राजकीय सोयीनुसार त्यांनी विधाने केली, असा आरोपही शंकराचार्य यांनी केला. त्यापाठोपाठ आता रामभद्राचार्यांनीही मोहन भागवत यांच्यावर टीका केली.ते हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत
ज्या आपल्या ऐतिहासिक वास्तू आहेत, त्या आपल्याला मिळाल्याच पाहिजेत किंवा त्या आपण ताब्यात घेतल्याच पाहिजेत. साम-दाम-दंड-भेद कुठलाही मार्ग असो, आपल्या संस्कृतीचा वारसा ताब्यात घेतला पाहिजे. मोहन भागवत जे म्हणाले ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. ते कदाचित संघाच्या वतीने बोलले असतील. कारण ते सरसंघचालक आहेत. पण मोहन भागवत हे काही हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत. हिंदू धर्माची व्यवस्था ही हिंदू आचार्यांच्या हाती आहे. कुठल्याही एका संघटनेच्या प्रमुखांच्या हाती नाही, असे रामभद्राचार्य म्हणाले.
पुण्यात हिंदू सेवा महोत्सव आयोजित कऱण्यात आला होता. त्यावेळी मोहन भागवत म्हणाले होते की, अयोध्येत राम मंदिर व्हावे ही अनेकांची इच्छा होती. मंदिर त्या ठिकाणी झालेही. मात्र आता तिरस्कार किंवा शत्रुत्वासाठी नवे मुद्दे निर्माण करण्याची आवश्यकता नाही. आपण जगाला हे दाखवून दिले पाहिजे की आपण सगळे सहिष्णुतेने आणि सद्भावनेने राहात आहोत. गेल्या काही दिवसांपासून मशिदींच्या खाली मंदिरे आहेत, असा दावा केला जातो आहे. उत्तर प्रदेशातल्या संभल या ठिकाणी मागील महिन्यात दंगल उसळली आणि चार लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या गोष्टी व्हायला नकोत, असे मोहन भागवत यांनी म्हटले होते. मात्र रामभद्राचार्य यांनी मोहन भागवत हे हिंदू धर्माचे प्रमुख नाहीत, असे म्हटले आहे.