नवी दिल्ली : वातावरण बदलाचे परिणाम संपूर्ण जगावर दिसत आहेत. काही ठिकाणी भीषण उन्हाळा तर काही ठिकाणी पावसाचे तांडव दिसत आहे. भारतात गेल्या दोन महिन्यांत ४० हजार जणांना उष्णतेचा तडाखा बसला आहे. या उष्णतेच्या लाटेमुळे देशात आतापर्यंत ११० जणांचा मृत्यू झाला आहे.
शास्त्रज्ञांनी सांगितले की, मानवाच्या वागणुकीमुळे हवामान बदल होत आहे. यामुळे आशियातील अब्जावधी लोक भीषण उष्णतेचा सामना करत आहेत. उत्तर भारतातील तापमान ५० अंशाच्या आसपास पोहचले आहे. हे तापमान आतापर्यंतचे विक्रमी आहे.
उन्हाळा पक्ष्यांना सोसवेना
यंदा कडक उष्णतेमुळे पक्षी आकाशात उडण्याऐवजी जमिनीवर मरून पडत आहेत. रुग्णालयात उष्णतेच्या लाटेने अत्यवस्थ रुग्णांची संख्या वाढली आहे. गरजेचे काम असतानाही लोक दुपारी घराबाहेर पडताना दिसत नाहीत. यंदा मार्चपासून सकाळी आणि रात्री तापमान उच्चांकावर नोंदले गेले. राजधानी दिल्लीची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. दिल्लीत ना पिण्याचे पाणी आहे ना वीज मिळत आहे.
आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, एक मार्च ते १८ जून दरम्यान ४० हजार उष्माघाताची प्रकरणे नोंदवली गेली. त्यात ११० जणांचा मृत्यू झाला आहे. वायव्य व पूर्व भारतात सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमान होते.
२४ तासांत २२ जणांचा मृत्यू
दिल्लीच्या आरएमएल व सफदरजंग व एलएनजीपी रुग्णालयात गेल्या २४ तासांत उष्माघाताच्या तडाख्याने २२ जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. सफदरजंग रुग्णालयात उष्माघाताशी संबंधित ३३ रुग्ण दाखल झाले. त्यातील १३ जणांचा मृत्यू झाला. आरएमएल रुग्णालयात २२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला. एलएनजीपी रुग्णालयात १७ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला.