आधार प्रणाली सुरू झाल्यापासून देशातील करोडो नागरिकांचे रजिस्ट्रेशन UIDAI कडे झाले आहे. दरवर्षी लाखो नवीन जन्मलेल्या मुलांचेही आधार नोंदणी केली जात आहे. शिक्षणासह विविध शासकीय सेवांसाठी आधार अनिवार्य झाल्यानं UIDAI च्या डेटाबेसमध्ये सातत्याने नोंदी वाढत आहेत. या वाढत्या डेटाबेसची अचूकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी UIDAI ने मोठ्या प्रमाणावर सफाई मोहीम हाती घेतली आहे.
१५ वर्षांत अनेक आधारधारकांचे निधन
गेल्या १५ वर्षांत मोठ्या संख्येने आधारधारकांचे निधन झाले आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूची अधिकृत माहिती UIDAI पर्यंत न पोहोचल्याने त्यांच्या आधार क्रमांक आजही सक्रिय आहेत. यामुळे काही ठिकाणी या निष्क्रिय व्हायला हवे असलेल्या आधार क्रमांकांचा गैरवापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. अवैधपणे बँक खाते उघडणे, फसवणूक व्यवहार करणे, तसेच सरकारी योजनांचा लाभ घेतल्याच्या अनेक तक्रारी UIDAI पर्यंत पोहोचल्या आहेत.
UIDAI ची कारवाई: २ कोटी आधार नंबर गोठविले
या परिस्थितीवर लगाम घालण्यासाठी UIDAI ने व्यापक तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत २ कोटींहून अधिक मृत व्यक्तींचे आधार क्रमांक निष्क्रिय (फ्रिझ) केले गेले आहेत.
हे क्रमांक कायमस्वरूपी बंद केले जातात आणि ते कोणत्याही इतर व्यक्तीला पुन्हा दिले जात नाहीत, अशी माहितीही UIDAI ने स्पष्ट केली आहे.
मृत्यूची माहिती मिळवण्यासाठी अनेक प्रणालींचा आधार
UIDAI ला आधी मृत व्यक्तींची माहिती स्वतंत्रपणे सांगितली जात नव्हती. त्यामुळे आता संस्थेने विविध अधिकृत यंत्रणांकडून माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे.
या यादीत मुख्यत:
भारताचे रजिस्ट्रार जनरल
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची नागरी नोंदणी प्रणाली (CRS)
सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS)
राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम (NSAP)
यांचा समावेश आहे. पुढील टप्प्यात बँका आणि अन्य महत्त्वाच्या संस्थांनाही या प्रक्रियेत जोडले जाणार आहे.
दुबार पडताळणी प्रणाली
अनेक संस्थांकडून मृत्यूची माहिती मिळूनही UIDAI स्वतंत्रपणे अतिरिक्त पडताळणी करते.
यामुळे चुकीने जिवंत व्यक्तीचा आधार क्रमांक रद्द होण्याची शक्यता पूर्णपणे टाळली जाते, असेही UIDAI ने सांगितले.
कुटुंबियांसाठी विशेष ऑनलाइन सुविधा
UIDAI ने पोर्टलवर ‘कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची नोंदणी’ ही नवी सेवा सुरू केली आहे.
यामध्ये कुटुंबातील सदस्य खालील माहिती स्वतः प्रमाणित करून देऊ शकतात:
मृत व्यक्तीचा आधार क्रमांक
मृत्यू नोंदणी क्रमांक (Death Registration Number)
अधिकृत मृत्यू प्रमाणपत्रातील आवश्यक तपशील
अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्वरित ही नोंद करणे आवश्यक असल्याचे UIDAI ने आवाहन केले आहे.
UIDAI चा उद्देश : फसवणूक रोखणे आणि डेटाबेस शुद्ध ठेवणे
या मोहिमेमुळे मृत व्यक्तींच्या नावाने होणाऱ्या फसवणुकीवर मोठा अंकुश बसेल. तसेच भविष्यात आधार डेटाबेस अधिक अचूक, सुरक्षित आणि अद्ययावत राहील, अशी अपेक्षा UIDAI ने व्यक्त केली आहे.