

वाराणसी : उत्तर प्रदेशातील सारनाथ या प्राचीन बौद्ध स्थळाचा युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा स्थळांच्या (World Heritage List) यादीत शनिवारी (दि. २५) समावेश करण्यात आला आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या ४८व्या अधिवेशनात हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळवणारे सारनाथ हे भारताचे ४५ वे वारसा स्थळ ठरले आहे.
भारताच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक मान्यता
भारताने २०२५-२६ या नामांकन फेरीसाठी Ancient Buddhist Site of Sarnath या नावाने प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर युनेस्कोने या प्रस्तावाला मंजुरी देत सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या घोषणेमुळे भारताच्या सांस्कृतिक वारशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.
२०२५ मध्ये पाठवला होता प्रस्ताव
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी ऑगस्ट २०२५ मध्ये सारनाथचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठविल्याची माहिती दिली होती. वाराणसीपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेले सारनाथ हे जगभरातील बौद्ध भाविक आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते.
सारनाथचे धार्मिक महत्त्व काय?
बौद्ध परंपरेनुसार, भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पहिले प्रवचन सारनाथ येथेच दिले होते. याच ठिकाणी त्यांनी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना कोंडण्य (कौंडिन्य), अस्सजी, भद्दिय, वप्प आणि महानाम यांना धम्माची शिकवण दिली. याच घटनेतून बौद्ध संघाची स्थापना झाली, त्यामुळे सारनाथला बौद्ध धर्मातील चार सर्वात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक मानले जाते.
'सारनाथ' नावामागची रंजक कथा
इतिहास आणि बौद्ध परंपरेनुसार, एका स्थानिक राजाच्या शिकारीदरम्यान राजा एका मादी हरणाची शिकार करणार होता. त्यावेळी तिचा जीव वाचवण्यासाठी एका नर हरणाने स्वतःचे बलिदान देण्याची तयारी दर्शवली. या करुणामय आणि निःस्वार्थ कृतीने प्रभावित होऊन राजाने त्या परिसरात शिकार बंद करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण क्षेत्र हरिण अभयारण्य म्हणून घोषित केले. याच आख्यायिकेमुळे या स्थळाला 'सारंगनाथ' (हरणांचा स्वामी) हे नाव मिळाले, जे पुढे 'सारनाथ' म्हणून प्रसिद्ध झाले.
भारतासाठी का महत्त्वाचा आहे हा निर्णय?
सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे भारताच्या बौद्ध वारशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मोठी ओळख मिळणार आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल. तसेच या ऐतिहासिक स्थळाच्या संवर्धन, जतन आणि जागतिक पातळीवरील प्रसिद्धीलाही मोठी चालना मिळेल.