रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेची भारताला ३० दिवसांची तात्पुरती सवलत

इराणसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने भारतासाठी तात्पुरती सवलत जाहीर केली आहे. या निर्णयानुसार भारतीय रिफायनरींना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे.
रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेची भारताला ३० दिवसांची तात्पुरती सवलत
Published on

नवी दिल्ली : इराणसोबत वाढत चाललेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने भारतासाठी तात्पुरती सवलत जाहीर केली आहे. या निर्णयानुसार भारतीय रिफायनरींना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची तात्पुरती परवानगी देण्यात आली आहे.

अमेरिकेचे ट्रेझरी सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी गुरुवारी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऊर्जा धोरणामुळे तेल आणि गॅस उत्पादन विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी भारतीय रिफायनरींना रशियन तेल खरेदीसाठी ३० दिवसांची तात्पुरती सवलत देण्यात येत आहे.

अल्पकालीन उपाय

बेसेन्ट यांनी स्पष्ट केले की, ही सवलत केवळ अल्पकालीन उपाय आहे आणि त्यामुळे रशियन सरकारला मोठा आर्थिक फायदा होणार नाही. कारण ही परवानगी फक्त समुद्रात अडकलेल्या तेलाच्या व्यवहारांपुरतीच मर्यादित आहे. ते पुढे म्हणाले की, भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे आणि भविष्यात भारत अमेरिकेकडून अधिक तेल खरेदी वाढवेल, अशी अपेक्षा आहे. इराणमुळे जागतिक ऊर्जा बाजारावर निर्माण झालेला दबाव कमी करण्यासाठी ही तात्पुरती सवलत देण्यात आली आहे.

२५ दिवसांचा साठा

भारताला मोठ्या प्रमाणात कच्चे तेल मध्य-पूर्वेतून आयात करावे लागते. सध्या देशाकडे सुमारे २५ दिवसांचा कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय भारतात येणाऱ्या सुमारे ४० टक्के तेलाची वाहतूक होर्मूझ सामुद्रधुनीमार्गे होते. त्यामुळे या मार्गात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास भारतासमोर ऊर्जा संकट निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला ३० दिवसांची तात्पुरती सवलत दिली आहे.

राहुल यांची टीका

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत ११ फेब्रुवारी रोजी केलेल्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी तेल खरेदीवरून अमेरिकेकडून सुरू असलेल्या मुस्कटदाबीवर जोरदार हल्ला चढवला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, परराष्ट्र धोरणाची सध्याची स्थिती "एका तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम आहे. त्यांनी पश्चिम आशियातील युद्ध आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार कराराबद्दल ही टिप्पणी केली.

हा शोषणाचा परिणाम!

राहुल गांधी यांनी एक्सवर म्हटले आहे की, भारताचे परराष्ट्र धोरण आपल्या लोकांच्या सामूहिक इच्छेने आकारले जाते. ते आपल्या इतिहासात, आपल्या भूगोलात आणि सत्य आणि अहिंसेवर आधारित आपल्या आध्यात्मिक नीतिमत्तेत रुजले पाहिजे. आज आपण जे पाहत आहोत ते धोरण नाही. ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचे परिणाम आहे, असा आरोप राहुल यांनी केला.

२ कोटी बॅरल खरेदी

दरम्यान, भारतातील प्रमुख तेल रिफायनरी कंपन्या पुन्हा सक्रिय झाल्या आहेत. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि मंगळुरू रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड या कंपन्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधत असून शक्य तितक्या लवकर रशियन तेल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या कंपन्यांनी आतापर्यंत सुमारे २ कोटी बॅरल रशियन तेलाची खरेदी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in