संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिला प्रवाशाला पोलिसाकडून बेदम मारहाण; Video व्हायरल

UP Train Assault : या घटनेनंतर सोशल मीडियावर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिला प्रवाशाला पोलिसाकडून बेदम मारहाण; Video व्हायरल
संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिला प्रवाशाला पोलिसाकडून बेदम मारहाण; Video व्हायरल (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
Published on: 

उत्तर प्रदेश : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याकडूनच महिला प्रवाशाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील नजीबाबादजवळ धावत्या जननायक एक्स्प्रेसमध्ये एका सरकारी रेल्वे पोलीस (GRP) कर्मचाऱ्याने महिला प्रवाशाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत महिलेच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे सांगण्यात येत आहे. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडलेल्या या प्रकारामुळे रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सीटवरून वाद, महिला प्रवाशाला मारहाण केल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, दरभंगा-अमृतसर जननायक एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक १५२११) मुरादाबादहून नजीबाबादच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. बिहारमधील रुबी देवी या आपल्या तीन मुलींसह छठपूजेचा सण साजरा करून लुधियानाकडे प्रवास करत होत्या. यावेळी ट्रेनमध्ये बरीच गर्दी होती.

दरम्यान, दोन जीआरपी कर्मचारी ललित सागर आणि अजय कुमार यांच्यासोबत रुबी देवी यांचा वाद झाला. एका पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्या मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. याला रुबी देवी यांनी विरोध केला. त्यानंतर बसण्याच्या जागेवरून वाद वाढल्याचे प्रवाशांनी सांगितले.

व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचाऱ्याकडून मारहाण

प्रवाशांच्या दाव्यानुसार, रुबी देवी यांनी विरोध केल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना आणि त्यांच्या मुलींना मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओही काढण्यात आला. व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये पोलिस कर्मचारी महिलेला थप्पड मारून खाली पाडताना दिसत आहे.

या मारहाणीत रुबी देवी यांच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला, तसेच त्या काही काळ बेशुद्ध झाल्याचेही वृत्त आहे. यानंतर डब्यातील इतर प्रवाशांनी त्यांच्या मदतीसाठी धाव घेतली.

आम आदमी पक्षाची रेल्वेमंत्र्यांवर टीका

आम आदमी पक्षाने हा व्हिडीओ 'एक्स'वर शेअर करत घटनेचा तीव्र निषेध केला आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत केंद्र सरकारकडून मोठमोठे दावे केले जातात. मात्र, प्रत्यक्षात महिलांना रेल्वे प्रवासात अशा प्रकारांना सामोरे जावे लागत असल्याची टीका पक्षाने केली.

तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावरही पक्षाने निशाणा साधला. प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याऐवजी प्रसिद्धी आणि प्रचाराच्या उपक्रमांवर अधिक भर दिला जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.

सहा प्रवाशांविरोधात गुन्हा

मात्र, या घटनेबाबत पोलिसांनी वेगळी बाजू मांडली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, एका महिलेला लहान मुलासाठी जागा करून देण्यास सांगितले असता तिने नकार दिला. त्यानंतर मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर बिहारमधील कुटुंबीयांनी हल्ला केला.

या प्रकरणी चार महिला आणि दोन पुरुष अशा एकूण सहा प्रवाशांविरोधात एफआयआर दाखल केल्याचे वृत्त आहे. तसेच दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे, रुबी देवी यांच्या कुटुंबीयांनीही पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला आहे. मात्र, त्यांच्या बाजूने अद्याप अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे वृत्त आहे.

संतापजनक! धावत्या ट्रेनमध्ये महिला प्रवाशाला पोलिसाकडून बेदम मारहाण; Video व्हायरल
Bengaluru Mass Murder : कॅब चालकाचे भयंकर कृत्य; पत्नीसह सासरच्या सहा जणांची वरवंट्याने ठेचून निर्घृण हत्या

सोशल मीडियावर कारवाईची मागणी

या संपूर्ण प्रकरणाचा मुरादाबाद जीआरपीकडून तपास सुरू आहे. व्हायरल व्हिडीओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे घटनेची चौकशी केली जात आहे. २० नोव्हेंबरपासून या घटनेचे व्हिडीओ 'एक्स' आणि इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ झाले आहेत.

या घटनेनंतर सोशल मीडियावर संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. मात्र, नेमका वाद कशामुळे झाला आणि दोन्ही बाजूंच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)