

उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात एका धक्कादायक घटनेत पाणी आणण्यास नकार दिल्यामुळे ९ वर्षीय मुलावर गोळीबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याकूतगंज गावात बारश्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मृत मुलगा यशपाल आपल्या वडिलांसोबत गावात आला होता. त्याच वेळी आरोपी धनिश यादव हा देखील समारंभात उपस्थित होता आणि मद्यपान करत असल्याचे सांगितले जात आहे.
पाणी आणण्यास नकार दिल्याने संताप
मृत मुलाचे वडील सुखवीर सिंह यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने यशपालला पाणी आणण्यास सांगितले. मात्र, मुलाने नकार दिल्यानंतर आरोपी संतापला आणि त्याने मुलावर गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळी मुलाच्या पोटात लागल्याने तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलाला प्रथम कासगंज जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला अलीगढ येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी (दि. २) त्याचा मृत्यू झाला.
आरोपीला अटक
पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी धनिश यादव याला अटक केली. त्याच्याकडून शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले. प्राथमिक टप्प्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अंतर्गत खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मुलाचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरणात खुनाचे कलम १०३(१) समाविष्ट करण्यात आले.
समारंभात घडली दुर्घटना
ही घटना १ आणि २ मेच्या दरम्यान रात्री घडल्याचे पोलिसांनी सांगितले. बारश्यादरम्यान घडलेल्या या घटनेने गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.