उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! पुलावरून बस थेट १०० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी

Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या टिहरी गढवालमध्ये प्रवासी बस पुलावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू, तर २६ प्रवासी जखमी झाले. अपघातापूर्वी चालकाला वेग कमी करण्यास सांगितल्याचा जखमी प्रवाशाचा आरोप...
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! पुलावरून बस थेट १०० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! पुलावरून बस थेट १०० मीटर खोल दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू, २६ जखमी
Published on: 

उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये मंगळवारी (दि. १७) पहाटे भीषण बस अपघात झाला. ऋषिकेश-बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून सुमारे १०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून, २६ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं.

पुलाचा कठडा तोडून बस दरीत कोसळली

समोर आलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ सेवा कंपनीची ही बस हरिद्वारहून जोशीमठच्या दिशेने जात होती. मंगळवारी पहाटे टिहरी गढवाल जिल्ह्यातील गूलर बाजारजवळ बसचालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर बस रस्त्याच्या बाजूचा कठडा तोडून पुलाखालील खोल दरीत कोसळली. या बसमध्ये सुमारे ३४ प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. बस सुमारे १०० मीटर खाली कोसळल्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने मदत आणि बचावकार्य सुरू केलं

८ जणांचा मृत्यू, २६ प्रवासी जखमी

पीटीआयच्या वृत्तानुसार, या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून, २६ जण जखमी झाले आहेत. सुरुवातीला मृतांचा आकडा कमी असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, बचावकार्य सुरू असताना मृतांचा आकडा वाढला. सात प्रवाशांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर एका प्रवाशाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. जखमींना रुग्णवाहिकांमधून ऋषिकेश येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. काही जखमींवर ऋषिकेशच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

SDRF पथकांकडून बचावकार्य

अपघाताची माहिती मिळताच ब्यास आणि ढालवाला येथील SDRF पथकं घटनास्थळी दाखल झाली. स्थानिक पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने दरीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. खोल दरी आणि कठीण भूप्रदेशामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या.

टिहरीच्या जिल्हाधिकारी नितिका खंडेलवाल आणि वरिष्ठ पोलिस अधीक्षक श्वेता चौबे यांनीही घटनास्थळी पोहोचून बचावकार्याचा आढावा घेतला.

अपघातापूर्वी चालकाला वेग कमी करण्यास सांगितलं?

दरम्यान, अपघातातून बचावलेल्या पंकज नावाच्या प्रवाशाने बस वेगात असल्याचा आरोप केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, काही प्रवाशांनी चालकाला दोन-तीन वेळा वेग कमी करण्यास सांगितलं होतं. काही वेळाने पंकजला डुलकी लागली, त्यानंतर नेमकं काय घडलं आणि अपघात नेमका कसा झाला, हे आपल्याला समजलं नसल्याचं त्याने सांगितलं.

या अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. चालकाचं नियंत्रण कशामुळे सुटलं आणि अपघाताला अतिवेग कारणीभूत होता का, याचा तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)