
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आता भीषण रूप धारण केलं आहे. मंगळवारी (दि. ५) उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात ढगफुटीची घटना घडली असून हे गाव या महाप्रलयात वाहून गेलं आहे. या नैसर्गिक आपत्तीनं संपूर्ण परिसरात हाहाकार माजवला आहे. गावातील घरे, दुकाने, माणसं आणि गुरंढोरं अक्षरशः गवतासारखी वाहून गेली आहेत.
स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केलेल्या व्हिडिओंमध्ये ढगफुटीच्या भीषण दृश्यांचा थरार स्पष्ट दिसत असून, प्रचंड जलप्रवाहासह संपूर्ण गाव काही क्षणातच नष्ट होताना दिसतो. या व्हिडिओंमध्ये लोकांच्या किंकाळ्याही स्पष्ट ऐकू येत आहेत.
पाहा व्हिडिओ -
खीरगंगा नदीच्या पाणी पातळीत अचानक मोठी वाढ झाल्याने नदीने रौद्ररूप धारण केलं आणि अवघ्या काही सेकंदांत किनाऱ्यावरील संपूर्ण वस्ती वाहून गेली. संपूर्ण धराली गाव पुराच्या तडाख्यात येऊन उद्ध्वस्त झालं असून ५० ते ६० लोक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या आपत्तीमुळे धराली गाव व त्याची बाजारपेठ पूर्णपणे नष्ट झाली आहे.
या घटनेत जीवितहानी झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.गावातील स्थानिक रहिवासी राजेश पनवार यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली सुमारे १०-१२ लोक गाडले गेले असावेत. २०-२५ हॉटेल्स आणि होमस्टे वाहून गेल्याची शक्यता आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले असून SDRF, NDRF, पोलीस दल आणि सैन्याच्या तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदत आणि शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू असून, भटवारी–गंगोत्री मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांना नदीपासून दूर राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने सर्व मदत यंत्रणा सज्ज ठेवल्या असून, पुरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.