
त्रिकूट पर्वतावरील प्रसिद्ध माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर मंगळवारी (दि. २६) मोठा अपघात घडला. अर्द्धकुंवारीजवळील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ भूस्खलन झाले असून यात ५ भाविकांचा मृत्यू झाला, तर किमान १४ भाविक जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी काही भाविक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी प्रशासनाने बचावकार्य सुरू केले आहे.
वैष्णोदेवी यात्रेला स्थगिती
हिमकोटी ट्रेक मार्गावर सकाळपासून यात्रा स्थगित करण्यात आली होती, परंतु दुपारी १.३० वाजेपर्यंत जुन्या मार्गावर यात्रा सुरू होती. मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलन झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत तातडीने श्रीनगरहून जम्मूकडे रवाना होणार असल्याचे जाहीर केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे २४ हून अधिक घरे व पुलांचे नुकसान झाले आहे. सर्व नद्यांचे पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, जम्मूमधील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. परिणामी नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.