
भारतामध्ये वाघ संरक्षणाच्या चळवळीला एक वेगळी दिशा देणारे आणि 'टायगर मॅन' म्हणून देश-विदेशात ओळखले जाणारे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि वन्यजीव संरक्षक वाल्मीक थापर यांचे शनिवारी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते आणि काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे अंतिम संस्कार दिल्लीतील लोधी इलेक्ट्रिक शवदाहगृहात दुपारी ३:३० वाजता पार पडले.
चार दशकांहून अधिक काळ वाघ संरक्षणासाठी समर्पित -
वाल्मीक थापर यांनी वन्यजीव आणि विशेषतः वाघ संरक्षणासाठी तब्बल ४० वर्षांहून अधिक काळ कार्य केले. १९८८ साली त्यांनी 'रणथंभोर फाउंडेशन' या संस्थेची सह-स्थापना केली, जी राजस्थानमधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात स्थानिक समुदायाच्या सहभागाने वनसंवर्धनासाठी कार्य करते.
त्यांचे संपूर्ण कार्य वाघांच्या संवर्धनासाठी समर्पित होते. त्यांनी मानवी हस्तक्षेपाशिवाय वाघांचे नैसर्गिक अधिवास जतन होण्यासाठी आणि शिकारीविरोधी कठोर कायदे लागू व्हावेत, यासाठी शासन पातळीवर मोठा आवाज उठवला. त्यांनी भारतातील अनेक व्याघ्र प्रकल्प आणि व्याघ्र धोरणांमध्ये सल्लागार म्हणून मोलाचे योगदान दिले.
रणथंभोर ते राष्ट्रीय धोरणांपर्यंत ठसा -
वाल्मीक थापर १५० हून अधिक सरकारी समित्यांमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होते. यामध्ये पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील 'नेशनल बोर्ड फॉर वाइल्डलाइफ' यांसारख्या उच्चस्तरीय संस्थांचा समावेश होता. २००५ मध्ये सारिस्का टायगर रिझर्वमधून वाघांच्या रहस्यमय गायब होण्याच्या पार्श्वभूमीवर स्थापन 'टायगर टास्क फोर्स' मध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
त्यांनी दर्जेदार डॉक्युमेंटरीज आणि पुस्तकांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये वाघांचे महत्त्व रुजवण्याचे कामही केले. त्यांच्या लेखनात आणि दृश्य माध्यमातील कार्यात भारतातील जंगलांचे वास्तव आणि संकटांचा खोलवर वेध घेतला गेला.
वैयक्तिक पार्श्वभूमी -
वाल्मीक थापर हे प्रसिद्ध पत्रकार रोमेश थापर यांचे पुत्र होते. तसेच अभिनेते शशी कपूर यांची कन्या अभिनेत्री संजना कपूर या त्यांच्या पत्नी आहेत. त्यांना एक मुलगा आहे. तर प्रसिद्ध लेखिका रोमिला थापर यांचे ते पुतणे होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ''प्रख्यात वन्यजीवसंरक्षक, लेखक, भारताचे टायगर मॅन अशी ओळख असणारे वाल्मिक थापर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी विविध व्याघ्रप्रकल्प विशेषतः रणथंबोर येथे अतिशय मोलाचे कार्य केले. त्यांच्या निधनामुळे पर्यावरण व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी कायम तत्पर असणारे एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.'' अशा शब्दांत शोक व्यक्त केला.
काँग्रेस नेते आणि माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी थापर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. "वाल्मीक थापर हे गेल्या चार दशकांत भारतातील वाघांच्या संवर्धनासाठी झगडणाऱ्या अग्रणी व्यक्तींपैकी एक होते. आजचा रणथंभोर त्यांच्या अथक परिश्रमांची जिवंत साक्ष आहे. त्यांच्या जाण्याने पर्यावरण क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे." अशी भावना त्यांनी व्यक्त केली.