

वाराणसी : मुंबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने प्रवास करण्यासाठी आलेल्या एका प्रवाशाच्या परवानाधारक पिस्तुलातून विमानतळावर अचानक गोळी सुटल्याने खळबळ उडाली. रविवारी (दि. १६) सकाळी वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलेल्या या घटनेत दोन सुरक्षा तपासणी कर्मचारी जखमी झाले. दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर आले होते दाम्पत्य
मिळालेल्या माहितीनुसार, आझमगड येथील ५५ वर्षीय कमलेश राय हे आपल्या पत्नीसोबत मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर आले होते. त्यांना एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-1810 या विमानाने प्रवास करायचा होता. राय यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल होते. विमानतळावर येण्यापूर्वी त्यांनी शस्त्राची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिली होती.
तपासणी सुरू असतानाच अचानक गोळी सुटली
विमानतळावर बोर्डिंगपूर्वी अनिवार्य सुरक्षा तपासणी सुरू होती. याचवेळी ग्राउंड स्टाफने राय यांच्याकडील परवानाधारक पिस्तूल तपासणीसाठी मागितले. तपासणीदरम्यान पिस्तूल प्रवाशाच्या हातात असतानाच त्याच्या चेंबरमध्ये असलेली एक गोळी अचानक सुटली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गोळीचा तुकडा लागल्याने दोघे कर्मचारी जखमी
पोलिसांच्या माहितीनुसार, गोळी आधी एका कठीण पृष्ठभागावर आदळली. त्यानंतर गोळीचा तुकडा किंवा त्यातून झालेला रिकोशे (परावर्तित तुकडा) जवळ उभ्या असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लागला. या घटनेत सुमन राणी आणि रोहित राज हे दोन कर्मचारी जखमी झाले.
महिला कर्मचाऱ्याच्या मांडीला, तर दुसऱ्याच्या बोटाला दुखापत
सुमन राणी यांच्या मांडीला दुखापत झाली, तर रोहित राज यांच्या बोटाला गोळीचा तुकडा लागला. दोघांनाही तातडीने न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्रवाशाकडे ऑल इंडिया परवाना
कमलेश राय यांच्याकडे या पिस्तुलासाठी ऑल इंडिया परमिट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शस्त्र बाळगण्याचा त्यांच्याकडे वैध परवाना होता. मात्र, विमानतळावर शस्त्र आणताना आणि तपासणीपूर्वी त्याच्या चेंबरमध्ये गोळी नसल्याची खात्री करण्याची जबाबदारी प्रवाशाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांकडून निष्काळजीपणाचा ठपका
या घटनेला प्रवाशाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. संबंधित प्रवासी नियमित विमानप्रवास करणारा असून, त्याच्याकडे हे परवानाधारक शस्त्र अनेक वर्षांपासून असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शस्त्र हाताळताना आवश्यक खबरदारी घेणे अपेक्षित होते, असेही पोलिसांनी नमूद केले.
BNS अंतर्गत गुन्हा दाखल होणार
या प्रकरणी प्रवाशाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२५ (अ) आणि १२५ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निष्काळजीपणामुळे दुखापत झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.