मुंबई : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाच्या प्रमुखपदाचा कार्यभार व्हाईस ॲडमिरल राहुल विलास गोखले यांनी नुकताच स्वीकारला.
दिशादर्शन क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या गोखले यांनी १ ऑक्टोबर रोजी या पदाचा कार्यभार स्वीकारला. गोखले हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (खडकवासला), डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (वेलिंग्टन), नेव्हल वॉर कॉलेज (गोवा) आणि ऑस्ट्रेलियन डिफेन्स कॉलेज (कॅनबेरा) या संस्थांचे माजी विद्यार्थी आहेत.
त्यांनी आपल्या कारकीर्दीत ‘आयएनएस कोरा’चे कार्यकारी अधिकारी आणि ‘आयएनएस खुर्की’ व ‘आयएनएस कोलकाता’चे कमांडिंग अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी नौदलाच्या पूर्व विभागाचे परिचलन अधिकारी म्हणूनही काम केले. त्यांनी इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायोगात नौदल सल्लागार म्हणूनही सेवा दिली आहे.