
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘दिल पर चलाई छुर्रियां’ या गाण्याने धुमाकूळ घातला होता. अलीकडेच राजू नामक एका कलाकाराच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्याचं गाणं आणि चिपळ्यांसारखी दगड वाजवण्याची शैली लोकांना इतकं भावली, की राजू रातोरात 'राजू सुपरस्टार' बनला. रस्त्यावर गाणं गाणाऱ्या राजूला थेट 'T-Series'मध्ये स्थान मिळालं.
लोकांनी त्याच्या या हटके अंदाजाची नक्कल करत अनेक रील्स बनवल्या. त्यातूनच आता या राजू सुपरस्टारला तगडी टक्कर देणारा एक नवा ‘स्टार’ सोशल मीडियावर झळकला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे आणि लोकं 'खरं टॅलेंट' म्हणत त्याचं कौतुक करत आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा घराच्या उंबऱ्यावर बसून राजूच्या शैलीतच हातात दगड वाजवत गाणं गातोय. तो ‘दिल पर चलाई छुर्रियां’ हे गाणं इतक्या जोशात आणि उर्जेने गातोय की पाहणाऱ्यांचे डोळे थक्क होतात. मध्ये मध्ये तो पायावर, चेहऱ्यावर, हातावर दगड आपटताना दिसत आहे. पण, तरीही चेहऱ्यावर कुठेही वेदनेचे हावभाव न दिसता तो तितक्याच जोशात गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या आवाजातली ऊर्जा, हावभाव आणि दगडाने निर्माण केलेले सूर पाहता, नेटकरी त्याला थेट 'राजू सुपरस्टारचं प्रोफेशनल वर्जन' म्हणू लागले आहेत.
पाहा व्हिडिओ -
नेटकऱ्यांनी या चिमुकल्याच्या टॅलेंटला भरभरून दाद दिलीय. ''राजू कलाकार फेमस झाला असला, तरी सुर-ताल या मुलाच्या नसानसांत आहेत'' अशी प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिली आहे. रीलच्या माध्यमातून अशा पडद्यामागच्या कलागुणांना वाव मिळत आहे.