

सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण जेव्हा विषय क्रिकेटचा असतो, तेव्हा लोकांची उत्सुकता आपोआप वाढते. विशेषतः विराट कोहली आणि एम. एस. धोनी यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. ते कुठे आहेत, काय करत आहेत, याकडे लोक लगेच लक्ष देतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने पसरतो आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण एकाच बाईकवरून रस्त्यावर जाताना दिसतात. पहिल्याच नजरेत अनेकांना वाटतं की हे विराट कोहली आणि धोनी आहेत.
ट्रॅफिक सिग्नलवर टिपलेला मजेशीर क्षण
हा व्हिडीओ ट्रॅफिक सिग्नलवर शूट करण्यात आला आहे. बाईकच्या मागे बसलेला तरुण विराट कोहलीसारखा दिसतो. त्यामुळे एक व्यक्ती त्याला ‘विराट कोहली’ म्हणून हाक मारतो. तेवढ्यात विराट सारखा दिसणारा तरुण बाईक चालवणाऱ्या तरुणाकडे हात दाखवत "एम, एस पण सोबत आहे", असं म्हणतो. हे ऐकताच सगळ्यांना हसू येतं आणि तो क्षण खास ठरतो.
खरे नाहीत, पण दिसायला अगदी जुळणारे
थोड्याच वेळात लक्षात येतं की हे दोघे खरे क्रिकेटपटू नाहीत. मात्र त्यांचा चेहरा, देहयष्टी आणि वागणूक इतकी जुळणारी आहे की अनेक जण थांबून त्यांच्याकडे पाहतात. काहीजण मोबाईल काढून व्हिडीओ शूट करतात.
विराटसारखा दिसणारा तरुण चेहऱ्याने आणि स्टाईलने खूप सारखा वाटतो. तर धोनीसारखा दिसणारा तरुण शांत स्वभावामुळे लोकांना ‘थाला’ची आठवण करून देतो.
व्हिडीओ व्हायरल, कमेंट्समध्ये धमाल
हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर अविराज पुरोहित (aviraaj._) या युजरने शेअर केला असून, अवघ्या काही तासांतच लाखो लोकांनी पाहिला, लाईक केला आणि शेअर केला. कमेंट सेक्शनमध्येही मजेशीर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला. एका युजरने, “क्षणभर खरंच विराट आणि धोनी वाटले!” अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने गंमतीने, “एका बाईकवर दोन दिग्गज, याला म्हणतात एन्ट्री!” असं लिहिलं. काही युजर्सनी दोघांच्या साम्याला गुण देत “विराट ६० टक्के, धोनी ९० टक्के” अशी टिप्पणी केली, तर काहींनी नावांमध्ये खेळ करत “किरत वोहली आणि एम. एस. सोनी” अशी मिश्किल कमेंट केली. एका युजरने तर थेट “मिशो वरुन मागवलेले विराट आणि धोनी” अशी मजेशीर कमेंट केली.