'आम्ही Gen Z...' म्हणत सैनिकांशी वाद घालणाऱ्या 'त्या' तरुणीने मागितली माफी; म्हणाली, "रागाच्या भरात चुकीचे बोलले"

रागाच्या भरात वापरलेले शब्द चुकीचे होते. या व्हिडीओचा इतका मोठा परिणाम होईल, याची आपल्याला कल्पना नव्हती...
'आम्ही Gen Z...' म्हणत सैनिकांशी वाद घालणाऱ्या 'त्या' तरुणीने मागितली माफी; म्हणाली, "रागाच्या भरात चुकीचे बोलले"
Published on

नवी दिल्ली : लडाखमधील एका चेक पोस्टवर सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालताना 'आम्ही Gen Z आहोत. आम्ही हा मूर्खपणा सहन करणार नाही!' असे वक्तव्य करणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर आता या तरुणीने भारतीय लष्करासह जम्मू-काश्मीर पोलीस आणि लडाख पोलिसांची माफी मागितली आहे. रस्त्यावर अनेक तास थांबावे लागल्याने आपण संतापलो होतो आणि त्या रागाच्या भरात चुकीचे शब्द वापरले, असे तिने स्पष्ट केले.

तीन-चार तास वाट पाहूनही रस्ता सुरू होईना...

ही तरुणी लडाखहून दिल्लीच्या दिशेने प्रवास करत होती. त्यावेळी सुरक्षा कारणामुळे रस्ता बंद करण्यात आला होता. हा प्रकार २६ जुलै रोजी, कारगिल विजय दिवसाच्या काळात घडल्याचे लडाख पोलिसांनी सांगितले आहे. मिनिमार्ग चेक पोस्टजवळ रस्ता बंद असल्याने अनेक प्रवासी बराच वेळ अडकले होते. सुरुवातीला तीन ते चार तास वाट पाहिल्यानंतरही रस्ता सुरू झाला नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी वाढली.

'आम्ही Gen Z आहोत...'

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ही तरुणी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसते. काही व्हीआयपी लोकांना आणि मंत्र्यांना पुढे जाण्याची परवानगी मिळत असल्याचा दावा करत तिने याबाबत प्रश्न उपस्थित केला. यावेळी तिने, ‘आम्ही Gen Z आहोत. आम्ही हा मूर्खपणा सहन करणार नाही!’ असे म्हटले. तिच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला आणि त्यावरून तिला टीकेला सामोरे जावे लागले.

सहा तासांपासून रस्त्यावर अडकल्याचा दावा

आता एनडीटीव्हीशी बोलताना तरुणीने या घटनेमागची परिस्थिती सांगितली. तिच्या म्हणण्यानुसार, ती आणि इतर प्रवासी जवळपास सहा तास रस्त्यावर अडकले होते. पुढे सुरक्षा कर्मचारी आणि काही नागरिकांमध्ये वाद झाल्याचेही त्यांना ऐकायला मिळाले. यानंतर ती पुढे गेली असता परिस्थिती आणखी चिघळली आणि संतापाच्या भरात तिचा सुरक्षा कर्मचाऱ्यांशी वाद झाला. प्रवासासाठी पैसे देऊनही एवढा वेळ थांबावे लागत असल्याने आपण त्रस्त झालो होतो, असे तिने सांगितले.

'माझे शब्द चुकीचे होते'

व्हिडीओमध्ये आपण जे बोललो ते योग्य नव्हते, अशी कबुलीही तिने दिली. रागाच्या भरात आपण वापरलेले शब्द चुकीचे होते. या व्हिडीओचा इतका मोठा परिणाम होईल, याची आपल्याला कल्पना नव्हती, असे तिने सांगितले. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झालेल्या टीकेमुळे आपण खूप त्रस्त झाल्याचेही तिने म्हटले.

‘Gen Z’ का म्हणाली?

व्हिडीओमधील 'आम्ही Gen Z आहोत' हे तिचे वक्तव्य विशेष चर्चेत आले होते. दिल्लीतील Gen Z आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर तिने हा शब्दप्रयोग केला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने सांगितले की, आजूबाजूचे लोक तिला चिथावत होते आणि त्यातूनच हा शब्द अचानक तिच्या तोंडून निघाला. 'Gen Z'चा उल्लेख करून कोणतेही वक्तव्य करण्याचा किंवा मुद्दाम संदेश देण्याचा तिचा हेतू नसल्याचे तिने स्पष्ट केले.

'आम्ही Gen Z...' म्हणत सैनिकांशी वाद घालणाऱ्या 'त्या' तरुणीने मागितली माफी; म्हणाली, "रागाच्या भरात चुकीचे बोलले"
'Gen Z काहीही करू शकतात!' पिवळी नाही केली जांभळी 'हळदी'; नवदांपत्याचा Video पाहून नेटकरी म्हणाले, 'थॅनोसचे नातेवाईक'

लष्करासह पोलिसांचीही मागितली माफी

या संपूर्ण प्रकाराबद्दल तिने भारतीय लष्कराची माफी मागितली. तसेच जम्मू-काश्मीर पोलीस, लडाख पोलीस आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचीही माफी मागितली."माझ्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या, याची मला खंत आहे," अशा शब्दांत तिने आपली बाजू मांडली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in