
आम्हाला हातात हातकडी आणि पायात साखळी बांधून परत पाठवण्यात आले. संपूर्ण प्रवासात आमचे हात आणि पाय बांधलेले होते. अमृतसर विमनातळावर पोहोचल्यावर आमच्या हातातील हतकड्या आणि पायातील साखळी खोलण्यात आली, असे 36 वर्षीय जसपाल सिंग याने सांगितले. जसपाल सिंग हा अमेरिकेने C-17 लष्करी विमानाने परत पाठविलेल्या 104 अवैध स्थलांतरित भारतीयांपैकी एक आहे.
ट्रम्प सरकारने बेकायदेशीरपणे अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या भारतीयांपैकी 104 जणांना पुन्हा भारतात पाठवले. अमेरिकेचे C-17 लष्करी विमान हे या भारतीय नागरिकांना घेऊन बुधवारी अमृतसर येथे पोहोचले. यामध्ये हरियाणा आणि गुजरात येथून प्रत्येकी 33 जण होते. 30 पंजाब येथून तर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथून 3 जण आणि दोन जण चंदीगढ येथून होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. तसेच यामध्ये 19 महिला आणि 13 अल्पवयीन मुलांचा समावेश होता. अल्पवयीन मुलांमध्ये चार वर्षीय मुलाचा आणि दोन मुलींचा समावेश आहे. तसेच 5 आणि 7 वर्षीय मुले देखील आहेत. अमृतसर विमानतळावरून त्यांना पोलिसांच्या गाडीतून त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले.
ट्रॅव्हल एजंटकडून आमची फसवणूक
प्रवासी जसपाल सिंग आणि अन्य काही लोकांनी घरी पोहोचल्यानंतर त्यांचे अनुभव सांगितले. जसपाल सिंग म्हणाला, आम्हाला ट्रॅव्हल एजंटकडून फसवण्यात आले. त्यांनी आम्हाला संपूर्ण वैध मार्गाने नेण्याचे सांगितले होते. मी एजंटकडे व्हिसा देखील मागितला होता. मात्र त्याने आम्हाला फसवले. अमेरिकेला नेण्यासाठी त्याने आमच्याकडून 30 लाख रुपये घेतले होते.
जसपालने दावा केला की, एजंटने त्याला जुलै 2024 मध्ये हवाईमार्गाने ब्राझीलला नेले. तिथून पुढचा प्रवास देखील हवाई मार्गानेच होईल, असे त्याने आम्हाला आश्वासन दिले होते. मात्र, तसे काहीही झाले नाही. त्यांनी आम्हाला फसवले. आम्ही सहा महिने ब्राझिलमध्ये राहिलो. त्यानंतर एजंटने आम्हाला जबरदस्तीने सीमा पार करायला लावली. मोठ्या मुश्किलीने सीमापार करून आम्ही अमेरिकेत पोहोचलो. मात्र अमेरिकेत गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या हातात आम्ही सापडलो. त्याला 11 दिवस ताब्यात ठेवल्यानंतर आम्हाला पुन्हा पाठवण्यात आले. मात्र, त्यावेळी भारतात परत पाठवण्यात येत होते, हे त्याला माहित नव्हते. सुरुवातीला वाटले की, आम्हाला दुसऱ्या कॅम्पमध्ये नेण्यात येत आहे. मात्र, नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, आम्हाला भारतात पुन्हा पाठवण्यात येत आहे. तर जसपालचा भाऊ जसबीर याने सांगितले की त्यांना माध्यमांद्वारे जसपालला पुन्हा पाठवण्यात येत असल्याची माहिती मिळाली.
आमची स्वप्ने भंग पावली
जसपाल प्रमाणेच आणखी काही प्रवाशांनी त्यांचे अनुभव कथन केले आहे. तसेच यावेळी त्यांनी सरकारवरही आपला राग व्यक्त केला आहे. ते म्हणाले हे सरकारचे प्रश्न आहेत. आम्ही कामासाठी जेव्हा परदेशात जातो तेव्हा आपल्या कुटुंबच्या चांगल्या भविष्यासाठी मोठे स्वप्न घेऊन जातो. मात्र आता आमची सगळी स्वप्ने धुळीस मिळाली आहेत.
आम्ही टेकड्या ओलांडल्या, समुद्रात आमची बोट उलटणार होती, पण...
तर होशियारपूरमधील ताहली गावातील रहिवासी असलेल्या हरविंदर सिंगने सांगितले की, तो गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेला निघून गेला होता. त्याला कतार, ब्राझील, पेरू, कोलंबिया, पनामा, निकाराग्वा आणि नंतर मेक्सिकोला नेण्यात आले. मेक्सिकोहून त्याला इतरांसह अमेरिकेत नेण्यात आले, असे तो म्हणाला. या खडतर प्रवासाचे त्याने वर्णन केले आहे. तो म्हणाला, "आम्ही टेकड्या ओलांडल्या. त्याला इतर लोकांसह घेऊन जाणारी एक बोट समुद्रात उलटण्याच्या बेतात होती पण आम्ही वाचलो. त्याने पनामाच्या जंगलात एक व्यक्ती मरताना आणि एकाला समुद्रात बुडताना पाहिले. 42 लाख रुपये खर्चून या प्रवासात आम्हाला फक्त भात खायला मिळाला, कधी-कधी फक्त बिस्किट खाऊन राहिलो. तर काही वेळा आम्ही उपाशी देखील राहिलो.''
'डंकी रूट'बद्दल प्रवाशांनी दिली आणखी माहिती...
ट्रॅव्हल एजंटकडून 'डंकी रुट'वरून अमेरिकेला नेण्यात येते. याविषयीचे भयावह अनुभव काहींनी सांगितले. एकाने सांगितले की वाटेत त्यांचे 30 ते 35 हजार रुपयांचे कपडे चोरीला गेले. तर आणखी एकाने सांगितले, आम्हाला पहिले इटली नंतर लॅटिन अमेरिकेला नेण्यात आले. 15 तास बोटीतून प्रवास केल्यानंतर 40 ते 45 किमी अंतर आम्ही पायी कापले. आम्ही 17-18 टेकड्या ओलांडल्या. या टेकड्यांवरून जर एखादा घसरला तर तो जीवंत वाचण्याची शक्यता नव्हती. कोणी जखमी झाला तर त्याला तिथेच मरण्यासाठी सोडून दिले जात असे. आम्ही अशा प्रकारे जखमी होऊन मेलेल्यांचे मृतदेह देखील पाहिले, अशी माहिती एकाने दिली.
अमृतसर विमानतळावरून परतलेल्या नागरिकांना घरी पाठवण्यापूर्वी त्यांचा काही गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का हे तपासण्यासाठी पंजाब पोलिसांसह विविध सरकारी संस्था आणि विविध राज्य आणि केंद्रीय गुप्तचर संस्थांनी चौकशी केली.