रानडुक्कराचा वन विभागाच्या पथकावर हल्ला; अधिकारी गंभीर जखमी; Video व्हायरल

उत्तर प्रदेशातील सिरसौली गावात रानडुक्कराला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावरच त्या रानडुक्कराने अचानक हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय...
रानडुक्कराचा वन विभागाच्या पथकावर हल्ला; अधिकारी गंभीर जखमी; Video व्हायरल
Published on

उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून एक थरारक आणि अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. उझानी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिरसौली गावात रानडुक्कराला पकडण्यासाठी गेलेल्या वन विभागाच्या पथकावरच त्या रानडुक्कराने अचानक हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पाहणाऱ्यांचा थरकाप उडवत आहे.

शेतपिकांच्या नुकसानीच्या तक्रारीनंतर वन पथक दाखल

सिरसौली गावात रानडुक्करांमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर वन अधिकारी शुभम प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. रानडुक्कराला जाळ्याच्या मदतीने पकडण्याची कारवाई सुरू असतानाच परिस्थिती अचानक बिघडली.

व्हिडिओमध्ये काय दिसतं?

व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, आक्रमक झालेलं रानडुक्कर थेट वन अधिकारी शुभम प्रताप सिंह यांच्यावर झेपावतं. जोरदार धडकेत अधिकारी जमिनीवर कोसळतात. त्यानंतर तब्बल दोन मिनिटं रानडुक्कर त्यांच्या अंगावरच बसून राहतं. अधिकारी स्वतःला वाचवण्यासाठी झगडत असताना, इतर वन कर्मचारी काठ्यांच्या मदतीने रानडुक्कराला दूर हुसकावण्याचा प्रयत्न करताना दिसतात. बराच वेळ संघर्ष झाल्यानंतर अखेर रानडुक्कर मागे हटतं आणि जखमी अधिकाऱ्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात पथकाला यश येतं.

अधिकाऱ्याची प्रकृती चिंताजनक

या हल्ल्यात शुभम प्रताप सिंह यांना गंभीर दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारांसाठी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना बरेली येथील उच्च उपचार केंद्रात हलवण्यात आलं आहे.

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी वन कर्मचाऱ्यांच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर वन्यजीव बचाव मोहिमांदरम्यान कर्मचाऱ्यांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या जीवघेण्या अडचणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबतही जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in