'गाडी थांबवली असती तर…'; धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा मृत्यू; वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याचा सहप्रवाशाचा आरोप, VIDEO

धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याचा सहप्रवाशाचा आरोप असून, या प्रकरणावर रेल्वे प्रशासनानेही आपली बाजू मांडली आहे.
'गाडी थांबवली असती तर…'; धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा मृत्यू; वैद्यकीय मदत वेळेत न मिळाल्याचा सहप्रवाशाचा आरोप, VIDEO
Published on

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एका व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. या व्हिडिओमध्ये धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. महिलेची प्रकृती गंभीर झाल्यानंतर सहप्रवाशांनी ट्रेन जवळच्या स्थानकावर थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, तसे न झाल्याने वेळेत वैद्यकीय मदत मिळाली नाही आणि महिलेचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात असून रेल्वे प्रशासनाकडून चौकशीची मागणी होत आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ जुलै २०२६ रोजी बांद्रा टर्मिनस–दिल्ली सराय रोहिल्ला गरीब रथ सुपरफास्ट एक्स्प्रेस (क्रमांक १२२१६) मध्ये घडली. संबंधित महिला आपल्या १८ वर्षीय मुलासोबत प्रवास करत होती. भरुच स्थानक सुटल्यानंतर महिलेची प्रकृती अचानक बिघडली आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर सहप्रवाशांनी तातडीने तिकीट तपासनीसाकडे (टीटीई) ट्रेन जवळच्या स्थानकावर थांबवण्याची विनंती केली, जेणेकरून रुग्णवाहिका बोलावून महिलेला तातडीची वैद्यकीय मदत मिळू शकेल. मात्र, ट्रेन जवळच्या स्थानकावर थांबवण्यात आली नाही आणि उपचार मिळण्यापूर्वीच महिलेचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला, असा दावा सोशल मीडियावर करण्यात आला आहे.

व्हिडिओसोबत शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, महिलेसोबत प्रवास करणाऱ्या तिच्या १८ वर्षीय मुलाला बराच वेळ आई फक्त बेशुद्ध पडली आहे, असेच वाटत होते. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक नियमांचे पालन केले होते का आणि हा मृत्यू टाळता आला असता का, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसते?

व्हायरल व्हिडिओच्या सुरुवातीला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर कोचच्या दरवाजाजवळ संबंधित महिला दिसते. त्यानंतर काही जण तिला मदत करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पुढील दृश्यांमध्ये काही प्रवासी आणि कर्मचारी महिलेचा मृतदेह डब्यातून बाहेर काढत असल्याचे दिसते.

व्हिडिओच्या शेवटच्या भागात एक सहप्रवासी सेल्फी व्हिडिओद्वारे संपूर्ण घटनेची माहिती देताना दिसतो. तो भावनिक होत, "भरुच स्थानकानंतर महिलेची प्रकृती बिघडल्याची माहिती आम्ही टीटीईला दिली. ट्रेन थांबवण्याची विनंती केली, मात्र ती थांबवण्यात आली नाही. नंतर करजनजवळ रुग्णवाहिका आली, पण तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला," असा दावा करत रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरतो.

रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण

दरम्यान, या प्रकरणावर वडोदरा विभागाच्या रेल्वे प्रशासनानेही स्पष्टीकरण दिले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, भरुच स्थानक सोडल्यानंतर संबंधित महिलेची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत जवळच्या इटोला स्थानकावर वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली.

महिलेला तेथून पोर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तसेच, महिलेच्या मुलाने प्रवासापूर्वीपासूनच आईची प्रकृती ठीक नसल्याची माहिती दिल्याचा दावाही रेल्वे प्रशासनाने केला आहे.

चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार

सध्या या प्रकरणातील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. एका बाजूला सहप्रवाशांनी ट्रेन वेळेत न थांबवल्याचा आरोप केला आहे, तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने वेळेत वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महिलेच्या मृत्यूला नेमके कोणते कारण कारणीभूत ठरले, तसेच आपत्कालीन परिस्थितीत सर्व नियमांचे पालन झाले होते का, याबाबतचे स्पष्ट चित्र अधिकृत चौकशी अहवालानंतरच समोर येणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in