

नोएडा : 'आई बसमधून उतरल्यानंतरच मी बसमधून उतरेन', २८ वर्षीय शशांक गुप्ता याचे हे शब्द अखेर त्याच्या आईसोबतच्या शेवटच्या क्षणांची साक्ष ठरले. जळत्या बसमधून स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी आईला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या शशांक या युवकाची धडपड अखेर अपुरी ठरली. बुधवारी (दि. २३) रात्री यमुना एक्स्प्रेसवेवर जळालेल्या एसी स्लीपर बसमध्ये शशांक आणि त्याची ४७ वर्षीय आई सुनीता गुप्ता यांच्यासह ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आईला एकटं सोडून बाहेर पडण्यास नकार देणाऱ्या शशांक याचा अखेरचा प्रवासही आईसोबतच संपला.
बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील काश्मिरी गेटहून महोबाकडे जाणाऱ्या एसी स्लीपर बसला जेवरजवळ यमुना एक्स्प्रेसवेवरील ३३ किलोमीटरच्या टप्प्याजवळ आग लागली. या बसमध्ये ३५ जण प्रवास करत होते. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला. शशांक गुप्ता आणि त्याची ४७ वर्षीय आई सुनीता गुप्ता यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. २६ प्रवासी, दोन चालक आणि एक वाहक या दुर्घटनेत बचावले.
आगीत गंभीररीत्या होरपळल्यामुळे शशांक आणि सुनीता यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी वेळ लागला. शुक्रवारी कुटुंबीयांनी दोघांची ओळख पटवली. सुनीता गुप्ता यांची ओळख त्यांच्या उंचीवरून, तर शशांक याची ओळख त्याने घातलेल्या अंगठीवरून करण्यात आली.
उपचारांसाठी गुरुग्राममध्ये मुक्काम
महोबा जिल्ह्यातील चरखारी येथील रहिवासी असलेल्या शशांक आणि सुनीता यांनी सुरुवातीला एकत्र प्रवास करण्याचे ठरवले नव्हते. सुनीता यांना गुडघेदुखीचा त्रास असल्याने उपचारासाठी त्या सुमारे महिनाभर गुरुग्राममध्ये शशांकसोबत राहत होत्या.
दरम्यान, चरखारी येथे शशांकच्या काकांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे दोघांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला. रेल्वेचे तिकीट उपलब्ध न झाल्याने त्यांनी राज कल्पना ट्रॅव्हल्सच्या स्लीपर बसमध्ये मागील बाजूस सीट बुक केल्या.
इंडिगोमध्ये अभियंता म्हणून कार्यरत
शशांक गुप्ता गुरुग्राममध्ये इंडिगोमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता. त्याच्या पश्चात वडील नीरज गुप्ता (भाजप जिल्हा कोषाध्यक्ष) आणि महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला धाकटा भाऊ निखिल आहे. शुक्रवारी मायलेकांचे मृतदेह चरखारी येथे नेण्यात आले.
प्रवाशांनी आधीच दिला होता आगीचा इशारा
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, बसला आग लागण्यापूर्वी प्रवाशांना काहीतरी जळत असल्याचा वास आला होता. शशांकचे वडील नीरज यांनी सांगितले की, प्रवाशांनी चालक आणि वाहकाला याबाबत सतर्क केले होते. मात्र, बस थांबवण्यात आली नाही, असा त्यांचा आरोप आहे.
एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलेल्या एका प्रवाशाच्या तक्रारीतही प्रवाशांनी जळत असल्याच्या वासाबाबत चालक आणि वाहकाला वारंवार सावध केले होते, मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. चालकाच्या सीटजवळ आग भडकण्यापूर्वी चालक आणि वाहक केबिनमध्ये धूम्रपान करत असल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
आग वेगाने पसरल्यानंतर बसमध्ये धूर साचला. त्यामुळे प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू केली. काही प्रवाशांनी खिडक्या फोडून बाहेर उड्या मारल्या, तर काही जण बस थांबल्यानंतर बाहेर पडण्यात यशस्वी झाले.
आईला सोडून बाहेर पडण्यास नकार
मात्र, गुडघ्याच्या त्रासामुळे सुनीता गुप्ता यांना हालचाल करणे कठीण जात होते. नीरज यांच्या म्हणण्यानुसार, इतर प्रवाशांनी कुटुंबीयांना दिलेल्या माहितीतून शशांकने आपल्या आईला मागे सोडून बाहेर जाण्यास नकार दिल्याचे समोर आले.
चालक आणि वाहकाने शशांकला बसमधून बाहेर पडण्यास सांगितले मात्र, तो आईसोबतच थांबला आणि तिला बाहेर पडण्याच्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करत राहिला. अखेर बसच्या केबिनमध्ये धूर भरल्याने मायलेकांचा दुर्दैवी अंत झाला.
९ जणांचा मृत्यू
या दुर्घटनेत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतांपैकी इतरांची ओळख छतरपूर येथील श्रुती रावत (२८), हमीरपूर येथील सरोज गुप्ता (५२), मयंक गुप्ता (२८) आणि उषा देवी (६५), हिसार येथील देवेंद्र सहाय भारद्वाज (६०), जालौन येथील हर शरण गुप्ता (५५) आणि ओमप्रकाश धन सिंह अशी सांगितली. शवविच्छेदनानंतर सर्व ९ मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चालक-वाहकाला अटक
या दुर्घटनेनंतर पोलिसांनी बसचा चालक आणि वाहकाला अटक केली. प्रवाशांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले का, बसमध्ये धूम्रपान केले जात होते का आणि आग लागल्यानंतर प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पुरेशी संधी व सुरक्षा व्यवस्था उपलब्ध होती का, याचा तपास केला जात आहे. या प्रकरणी जेवर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.