मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच, ७० मनसैनिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबई येथे चार महिने उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता मनसे समर्थक आक्रमक झाले आहेत.
नेमके प्रकरण काय?
नवी मुंबई येथे अमित ठाकरे हे कामानिमित्त गेले होते. त्यावेळी त्यांना नेरुळ येथील राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल समजले. गेले चार महिने या पुतळ्याचे अनावरण झाले नव्हते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पुतळा खराब कपड्याने झाकून ठेवला होता. त्यामुळे त्यांनी परवानगीची वाट न बघता पुतळ्याचे अनावरण केले. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
‘महाराजांना अशा अवस्थेत आम्ही अजिबात पाहणार नाही’
या प्रकरणी अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. यावर स्पष्टीकरण देत ते म्हणाले की, "चार महिन्यांत विमानतळासाठी, दहीहंडी, दिवाळी, दसरा… सगळ्या कार्यक्रमांना नेते पोहोचले. मग आपल्या स्वराज्याचे संस्थापक, आपल्या आराध्य दैवत असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण करायला त्यांना एक तासही मिळाला नाही का? निवडणुकांच्या वेळी महाराजांचा जयजयकार करणारे, भाषणातून शिवरायांच्या नावावर टाळ्या घेणारे… यांना पुतळ्याचे लोकार्पण करायला वेळ नाही? हे महाराष्ट्रात घडतंय, हेच लाजिरवाणं आहे."
पुढे ते म्हणाले, "म्हणूनच, आज जेव्हा मी आणि माझे सहकारी पुतळ्याजवळ पोहोचलो, तेव्हा एकच भावना सगळ्यांच्या मनात होती, ‘महाराजांना अशा अवस्थेत आम्ही अजिबात पाहणार नाही’. सगळ्यांनी ठामपणे सांगितलं की हा अपमान आता थांबायलाच हवा. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळूनच ठरवलं की हा पुतळा आजच लोकांच्या दर्शनासाठी खुला करायचा." यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत सांगताना ते म्हणाले, "पण तेव्हाही पोलीसांनी आमच्या सहकाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यासाठीही आता अडथळे? एवढी घाणेरडी पातळी गाठलीये का? हे नेमकं कोणाच्या आदेशाखाली चाललंय?" असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला.
अमित ठाकरेंवर पहिलीच राजकीय केस
अमित ठाकरे म्हणाले, "हा माझ्या महाराजांचा महाराष्ट्र आहे. त्यामुळे ही माझ्या आयुष्यातील पहिली राजकीय केस असेल, तर मला आनंद आहे की ती माझ्या महाराजांसाठी आहे. आणि भविष्यात महाराष्ट्राच्या, महाराजांच्या सन्मानासाठी दहा नव्हे, दहा हजार वेळा पुढे उभं राहावं लागलं तर मी तयार आहे. पण, महाराष्ट्राच्या अस्मितेशी कुणाला खेळ करू देणार नाही."
पुढे ते म्हणाले, "महाराजांच्या सन्मानासाठी पुढे येणं ही आमची जबाबदारी होती, आणि आम्ही ती पार पाडली. त्यामुळे आजपासून महाराजांचा हा पुतळा विधीवत पूजेसह नवी मुंबईकरांसाठी दर्शनाकरिता खुला असेल, असे आम्ही जाहीर करतो. ही लढाई इथेच थांबणार नाही. महाराजांचा आणि महाराष्ट्राचा अपमान कुठेही झाला, तर मनसे त्याला थेट उत्तर देईल. आम्ही कोणाला घाबरणारे नाही, आणि शिवरायांसाठी तर अजिबात नाही," असा थेट इशारा अमित ठाकरे यांनी दिला.