फूड डिलिव्हरी बॉयपासून कॉर्पोरेट मीटिंगपर्यंत: नवी मुंबईतील तरुणाने शेअर केला दीड वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; Video व्हायरल

गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या हजारो फूड डिलिव्हरी कामगारांना बऱ्याचदा अपमानास्पद वागणूक सहन करावी लागते. हेल्मेट, बॅग आणि डिलिव्हरी युनिफॉर्ममुळे त्यांना कमी लेखलं जातं. याच संघर्षातून बाहेर आलेल्या एका तरुणाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होतेय.
फूड डिलिव्हरी बॉयपासून कॉर्पोरेट मीटिंगपर्यंत: नवी मुंबईतील तरुणाने शेअर केला दीड वर्षांचा प्रेरणादायी प्रवास; Video व्हायरल
Published on

गेल्या काही वर्षांत ऑनलाइन डिलिव्हरी सेवा आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा आधार बनल्या आहेत. बाजारात जायला वेळ नसेल, अचानक पाहुणे आले तर किंवा जेवण बनवणं शक्य नसेल, तर आपण एका क्लिकवर ऑनलाइन डिलिव्हरीवर अवलंबून राहतो. या सोयीमागे फूड डिलिव्हरी कामगारांची मेहनत आहे. अशाच एका ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वेळेवर ऑर्डर पोहोचवण्यासाठी जीव तोडून मेहनत करूनही अनेकदा फूड डिलिव्हरी कामगारांना अपमानास्पद वागणूक सहन करावी लागते. हेल्मेट, बॅग आणि डिलिव्हरी युनिफॉर्ममुळे त्यांना कमी लेखलं जातं. गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या हजारो फूड डिलिव्हरी कामगारांचा हा अनुभव आहे. याच संघर्षातून बाहेर आलेल्या एका तरुणाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होतेय.

हा तरुण म्हणजे अजित सिंह राठोड. खारघरमधील एका आलिशान इमारतीसमोर उभा राहून त्याने आपला अनुभव मांडला आहे. कधी फूड डिलिव्हरी बॉय म्हणून अपमान सहन करणारा हा तरुण आज त्याच इमारतीत कॉर्पोरेट क्लायंटला भेटायला जातो आणि हाच क्षण त्याच्या मेहनतीचा, संघर्षाचा आणि जिद्दीचा ठोस पुरावा ठरतो.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अजित सांगतो की, दीड वर्षांपूर्वी तो याच इमारतीत झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून यायचा. आज मात्र तो याच बिल्डिंगमध्ये त्याच्या एका कॉर्पोरेट क्लायंटला भेटायला आला आहे. नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी कंपनीकडून एक गिफ्ट घेऊन तो इथे आला होता आणि हाच क्षण त्याच्यासाठी भावनिक ठरला.

सुरक्षारक्षक गाडी पार्क करू द्यायचे नाहीत आणि आज...

"दीड वर्षांपूर्वी मी याच अपार्टमेंटमध्ये फूड डिलिव्हरीसाठी यायचो. तेव्हा माझ्याकडे स्कूटर होती. सुरक्षारक्षकांनी मला कधीच गाडी आत पार्क करू दिली नाही. त्यामुळे गाडी बाहेर लावून एवढ्या मोठ्या सोसायटीत चालत जावं लागायचं. आधी जे मला अडवायचे तेच सुरक्षारक्षक आज मला सॅल्यूट करत ‘जी सर, जी सर’ म्हणत आहेत," असं तो सांगतो.

तो पुढे म्हणतो, "आज मात्र मी याच सोसायटीत एसयूव्हीमधून आलो आहे. ही एसयूव्ही माझी वैयक्तिक नाही, तर माझ्या कंपनीची आहे. गिफ्टही कंपनीचंच आहे आणि ज्याला भेटायला आलोय तो क्लायंटही कंपनीचाच आहे. पण जी मेहनत आहे, ती आमची आहे."

वेळ कधीही बदलू शकते

व्हिडीओच्या शेवटी अजित भावूक होत म्हणतो, "हा व्हिडीओ मी यासाठी बनवत आहे कारण मला एकच गोष्ट सांगायची आहे - वेळ कधीही बदलू शकते. आयुष्यात कधी काय घडेल, सांगता येत नाही. ज्या ठिकाणी मी एकेकाळी फूड डिलिव्हरी बॉय म्हणून येत होतो आणि जिथे मला अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळायची, आज त्याच ठिकाणी मी मीटिंगसाठी आलो आहे. शेवटी एवढंच सांगतो, सगळं मेहनतीवर अवलंबून आहे. प्रामाणिक मेहनत करा, यश नक्कीच मिळेल.”

अजितची ही कहाणी केवळ वैयक्तिक यशाची नाही, तर गिग इकॉनॉमीमध्ये काम करणाऱ्या हजारो तरुणांसाठी आशा देणारी आहे. मेहनत, संयम आणि वेळ यांचा संगम आयुष्य कसं बदलू शकतो, हे या व्हिडीओमधून ठळकपणे समोर येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in