

नवी मुंबई : खारघर सेक्टर-१७ येथील ‘सेलिब्रेशन केएच-४’ गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांनी सिडको आणि सोसायटी व्यवस्थापनाच्या कारभाराविरोधात एल्गार पुकारला आहे.
मास हाऊसिंग स्कीम-२०२४ अंतर्गत घर मिळालेल्या लाभार्थ्यांनी सिडकोवर आरोप केले असून, घराचा ताबा देताना प्री पझेशन कालावधीतील लाखो रुपयांच्या जुन्या थकबाकीचा बोजा जबरदस्तीने सदनिका धारकांच्या अंगावर मारला जात आहे. घर दिलं, पण अनपेक्षित कर्जाचा बोजा लादला, अशी संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवासी व्यक्त करत आहेत.
खारघरमध्ये १९ इमारतींमध्ये एकूण ५३२ सदनिकांचा ‘केएच-४’ प्रकल्प उभारला होता. या प्रकल्पाला २०१० मध्ये भोगवटा प्रमाणपत्र मिळाले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने घरांची सोडत काढण्यात आली. मात्र, २०११ पासून या सदनिकांचा देखभाल खर्च आणि इतर देणी प्रलंबित आहेत. सिडकोच्या मालकीच्या ज्या सदनिका अद्याप विकल्या गेल्या नव्हत्या, त्यांचाही देखभाल खर्च आता २०२४ मध्ये ताबा घेणाऱ्या नवीन लाभार्थ्यांकडून वसूल केला जात आहे.
थकबाकीचा आकडा लाखांच्या घरात
रहिवाशांच्या दाव्यानुसार, प्रति सदनिका देखभाल खर्च सुमारे ११ लाखांपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय इमारत दुरुस्ती व रंगकाम निधीपोटी १ लाख ९१ हजार रुपये व पनवेल महापालिका हद्दीत मालमत्ता हस्तांतर करण्यापूर्वीचा मालमत्ता करही नवीन रहिवाशांकडून मागितला जात आहे.
नियमांचे उल्लंघन आणि दुहेरी वसुली
सोडतीतील अटींनुसार, सदनिकेचा ताबा मिळेपर्यंतची सर्व थकबाकी भरण्याची जबाबदारी प्रवर्तक म्हणून सिडकोची आहे. लाभार्थ्यांनी शेअर भांडवलासाठी ६०० रुपये जमा करूनही त्यांना अद्याप सोसायटीचे सदस्यत्व देण्यात आलेले नाही. २०११ पासूनच्या थकबाकीसाठी सोसायटीने आजपर्यंत कोणतीही कायदेशीर कारवाई का केली नाही? असा सवाल केला.