नवी मुंबई 'पिस्तूल'चे 'पंजाब कनेक्शन' उघड

नवी मुंबई पोलिसांनी पंजाबमधून चालणारे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू असतानाच आता विदेशी शस्त्रांचाही पुरवठा त्याच मार्गे होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिक-पुणे मार्गावर पकडलेल्या आरोपीकडून ऑस्ट्रिया बनावटीचे पिस्तूल जप्त झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
नवी मुंबई 'पिस्तूल'चे 'पंजाब कनेक्शन' उघड
नवी मुंबई 'पिस्तूल'चे 'पंजाब कनेक्शन' उघडसंग्रहित छायाचित्र
Published on

नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी पंजाबमधून चालणारे ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त करण्याची कारवाई सुरू असतानाच आता विदेशी शस्त्रांचाही पुरवठा त्याच मार्गे होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिक-पुणे मार्गावर पकडलेल्या आरोपीकडून ऑस्ट्रिया बनावटीचे पिस्तूल जप्त झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

दोन आठवड्यांपूर्वी नाशिक ते पुण्यातील निगडीपर्यंत पाठलाग करून पोलिसांनी एका संशयिताला अटक केली होती. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेले ‘ग्लॉक’ कंपनीचे ऑस्ट्रिया बनावटीचे पिस्तूल पंजाबमार्गे आणण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे संबंधित आरोपी हा ड्रग्ज वितरण साखळीतही सक्रिय असल्याचे उघड झाले आहे.

शहरात राबविण्यात येत असलेल्या नशामुक्ती अभियानांतर्गत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी स्वतः लक्ष घातल्याने पंजाबमधून ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, आता त्याच मार्गाने विदेशी शस्त्रांची तस्करी होत असल्याने पोलिसांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधून आणलेले अमली पदार्थ नाशिकमार्गे पुण्यात पोहोचवले जात होते. त्यानुसार नाशिक-पुणे मार्गावर सापळा रचण्यात आला. संशयित वाहन दिसताच पोलिसांनी पाठलाग करून निगडी परिसरात आरोपीला १५ मार्च रोजी अटक केली. त्यावेळी त्याच्याकडून विदेशी पिस्तूल जप्त करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणामुळे ड्रग्ज आणि शस्त्र तस्करीचा एकत्रित ‘पंजाब कनेक्शन’ उघड झाल्याने सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढली असून पुढील तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

मुंबईतील विक्रोळी परिसरातून दीपक चणचण सिंग खैनाल याला १ एप्रिल रोजी अटक केली. तपासात त्याने पंजाबमधून ‘ग्लॉक’ पिस्तूल मागविल्याचे समोर आले. त्याच्या घराची झडती घेतली असता सुमारे ४० हजार रुपये किमतीचे चरस, वजनकाटा आणि प्लास्टिक पिशव्या असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. पंजाबहून नवी मुंबईत ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या आतापर्यंत ३८ जणांना अटक करण्यात आली आहे. दीपकच्या अटकेमुळे या रॅकेटमधील शस्त्र पुरवठ्याचे जाळे उघड होण्याची शक्यता आहे.

संदीप निगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

logo
marathi.freepressjournal.in