

नवी मुंबई : कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा केल्याप्रकरणी नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
नेरूळ एलपी परिसरातील विद्युत केबल शॉर्टसर्किट दुर्घटनाप्रकरणी कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, तर ऐरोली येथील राजमाता जिजाऊ सार्वजनिक रुग्णालयातील गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भावना पगारे यांच्यावर २ जुलै रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली.
मनसेच्या आक्रमक अर्धनग्न ठिय्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनाने ही कठोर कारवाई केल्याने महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नेरूळ येथे १ जुलै रोजी पावसाच्या पाण्यात विद्युत केबलचा संपर्क आल्याने दोन विद्यार्थिनींना विजेचा तीव्र धक्का बसला होता.
या घटनेत प्रथमदर्शनी कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांचा हलगर्जीपणा आढळून आल्याने महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.