
सर्वत्र दिवाळीच्या उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असताना नवी मुंबईत दुर्दैवी घटना घडली. वाशी सेक्टर १४ मधील रहेजा रेसिडेन्सी इमारतीत सोमवारी (दि. २०) मध्यरात्री भीषण आग लागली. १०व्या मजल्यावर लागलेली ही आग काही क्षणांतच ११व्या आणि १२व्या मजल्यावर पसरली. या आगीत ६ वर्षांच्या चिमूरडीसह तिच्या आई वडिलांचा मृत्यू झाला. तसेच, एका वृद्ध महिलेचाही मृत्यू झाला. तर, १० जण जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेत वेदिका सुंदर बालकृष्णन (वय ६), सुंदर बालकृष्णन (वय ४४), पूजा राजन (वय ३९) आणि कमला हीरालाल जैन (वय ८४) यांचा मृत्यू झाला. जखमींमध्ये घोष, जैन आणि अग्रवाल कुटुंबातील सदस्यांचा समावेश असून त्यांना फोर्टिस हिरानंदानी आणि एमजीएम रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. हे सर्वजण रहेजा रेसिडेन्सीमधील रहिवासी आहेत.
घटनेचे कारण
घटनेची माहिती मिळताच वाशी, नेरुळ, ऐरोली आणि कोपऱेखैरणे येथील विविध अग्निशमन केंद्रांमधून गाड्या घटनास्थळी धावल्या. जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, आग पूर्णत: १२ व्या - १३ व्या मजल्यावर पोहचली होती. NMMC चे मुख्य अग्निशमन अधिकारी पुरूषोत्तम जाधव म्हणाले, “बचाव मोहिमेदरम्यान चार जण मृत अवस्थेत सापडले, तर सुमारे १० ते १५ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आग १०व्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये लागली होती. मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही.”
अग्निशमन विभाग आणि पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार आग लागण्यामागे विद्युत बिघाडाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी पंचनामा सुरू असून, इमारतीतील इतर रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
घरगुती उपकरणे नीट तपासा
NMMC प्रशासनाने रहिवाशांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, इमारतीच्या सुरक्षिततेसंबंधी त्वरित खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, नागरिकांनी आपले घरगुती उपकरणे आणि विद्युत वायरिंगची नीट तपासणी करावी, असे सल्ला दिला आहे.