

उरण : उरण तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या एमआयडीसीच्या रानसई धरणाची पाणीपातळी अत्यंत चिंताजनक पातळीवर खालावली असून धरणाने यंदा वेळेपूर्वीच तळ गाठला आहे. धरणातील मुख्य पाणीसाठा पूर्णपणे संपल्याने आता प्रशासनाला मृत साठ्यातून पाणी उपसा करावा लागत आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ८३ फुटांवर पोहोचली असून मृतसाठ्याची अंतिम मर्यादा ८१ फूट आहे. यंदा उन्हाचा कडाका वाढल्याने धरणातील जलसाठा वेगाने आटला असून पूर्वी धरणातील पाणी दररोज २ इंचाने कमी होत होते, मात्र आता तीव्र उष्णतेमुळे हे प्रमाण दिवसाला ३ इंचांवर आले आहे. उपलब्ध पाणी जेमतेम २५ जूनपर्यंतच पुरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
उरण तालुक्याला दररोज सुमारे ४० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. पुढील महिनाभराचे नियोजन कोलमडू नये, यासाठी एमआयडीसीने सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज ४ एमएलडी पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. रानसई धरणावर तालुक्यातील २४ ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद यांसह ओएनजीसी, एनएडी आणि बीपीसीएल सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची तहान अवलंबून आहे.