उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी

यंदा पावसाने ओढ दिल्याने उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही प्रमुख धरणांनी तळ गाठला असून संपूर्ण तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.
उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी
उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी
Published on

राजकुमार भगत /उरण :

यंदा पावसाने ओढ दिल्याने उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई आणि पुनाडे या दोन्ही प्रमुख धरणांनी तळ गाठला असून संपूर्ण तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर रानसई धरणाची उंची वाढविणे तसेच पुनाडे धरणातील गळती रोखून त्याची साठवण क्षमता वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

केगाव आणि चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील गावांना या टंचाईचा सर्वाधिक फटका बसला असून नागरिकांना १२ ते १५ दिवसांआड पाणी मिळत आहे. त्यामुळे बोअरवेल आणि विहिरींवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. मात्र, विहिरींनीही तळ गाठल्याने नागरिकांना महागड्या दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेली अनेक कामे गेल्या चार वर्षांपासून रखडल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. साठवून ठेवलेले पाणी दूषित होत असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

पुनाडे आठ गाव पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य ॲड. अविनाश ठाकूर यांनी सांगितले की, पाणीपुरवठा करणाऱ्या दोन विद्युत पंपांपैकी एक पंप नादुरुस्त झाल्याने टंचाईची समस्या अधिकच तीव्र झाली आहे. पंप दुरुस्तीसाठी जीवन प्राधिकरण विभागाला कळविण्यात आले असून तोपर्यंत नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

उरण तालुक्यात भीषण पाणीटंचाई; रानसई आणि पुनाडे धरणांनी गाठला तळ, अनेक गावांना १२ ते १५ दिवसांआड पाणी
उरणवर पाणीसंकटाचे सावट; रानसई धरण आटले, मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू

रानसई, केळ्याचा माळ, चांदायली वाडी, खैरकाठी, बंगल्याची वाडी, सागाचीवाडी आणि मार्गाची वाडी या आदिवासी वस्त्यांनाही पाणीटंचाईचा मोठा फटका बसला आहे. सध्या यापैकी दोन आदिवासी वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील सहा आदिवासी वाड्या तसेच चाणजे, केगाव आणि पुनाडे धरणावर अवलंबून असलेल्या आठ गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढत असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

महेश म्हात्रे, सभापती उरण पंचायत समिती

४० एमएलडी पाण्याची आवश्यकता

उरण शहर, औद्योगिक क्षेत्र आणि ग्रामीण भागातील २५ ग्रामपंचायतींमधील सुमारे दोन लाख लोकसंख्येसाठी दररोज ४० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. उरण एमआयडीसीच्या माहितीनुसार, ११६ फूट उंची असलेल्या रानसई धरणाची पाणीपातळी ८२ फुटांपर्यंत खाली आली असून मृतसाठ्याची मर्यादा ८१ फूट आहे. त्यामुळे धरणात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. टंचाईवर मात करण्यासाठी सिडकोकडून दररोज ४.५ एमएलडी पाणी घेतले जात आहे. तसेच आठवड्यातील दोन दिवस पाणी कपात लागू करण्यात आली असून सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन एमआयडीसी प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in