

उरण : रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये सोमवारी (दि. १६) सकाळी एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील प्लॅटिनम लॉजिस्टिकच्या गोदामात रसायनांचा साठा असल्याने आगीदरम्यान मोठा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. या स्फोटानंतर आगीचा भडका उडाला आणि परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. या आगीचे व्हिडीओही समोर आले असून, त्यामध्ये गोदामाच्या परिसरातून धुराचे मोठे लोट हवेत पसरताना दिसत आहेत.
केमिकलच्या गोदामात स्फोट
समोर आलेल्या माहितीनुसार, उरण तालुक्यातील वेश्वी येथील प्लॅटिनम लॉजिस्टिक या मालाची साठवणूक करणाऱ्या गोदामाला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केलं. गोदामात रसायनांचा साठा असल्याने आगीदरम्यान मोठे स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्फोटांचा आवाज परिसरात ऐकू गेल्याने स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली.
गोदामातून आगीच्या ज्वाळा आणि धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते. धूर आसपासच्या भागात पसरल्याने काही नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची माहितीही समोर आली आहे.
अग्निशमन दलाची घटनास्थळी धाव
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी गोदामात रसायन सांडलं असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
आगीचं कारण अद्याप अस्पष्ट
या घटनेमुळे गोदामातील मालाचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. मात्र, नुकसानीचा नेमका आकडा समोर आलेला नाही. तसेच या आगीत कोणी जखमी झालं आहे का किंवा जीवितहानी झाली आहे का, याबाबतही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.