

उरण : पावसाळी वातावरणातील सततच्या बदलांमुळे उरण तालुका व शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून संपूर्ण परिसराला पावसाळी तापाचा तीव्र विळखा बसला आहे. जूनच्या तुलनेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सर्दी, खोकला, अंगदुखी, हिवताप (मलेरिया), काविळ आणि डेंग्यूसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली असून दररोज शेकडो नागरिक उपचारासाठी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत.
तालुक्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये सध्या रुग्णांची मोठी गर्दी दिसून येत आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, जून महिन्यात उरण तालुक्यात हिवतापाचे ४५० रुग्ण आढळले होते. जुलैमध्ये ही संख्या तब्बल १ हजार ३८० वर पोहोचली. तर ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांतच १ हजार १४२ हिवतापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. डेंग्यूची स्थितीही चिंताजनक असून जूनमध्ये ६६ असलेली रुग्णसंख्या ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात शासकीय व खासगी रुग्णालयांतील नोंदीनुसार २४७ वर पोहोचली आहे.
ऑगस्टच्या पहिल्या १५ दिवसांत उरण शहरात दररोज सरासरी २०० हून अधिक, तर संपूर्ण तालुक्यात सुमारे ७०० रुग्ण सर्दी, खोकला, अंगदुखी, ताप, काविळ आणि डेंग्यूसह विविध आजारांवर उपचार घेत असल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील सततच्या बदलांचा लहान मुलांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम झाला असून सर्दी, खोकला आणि तापाच्या तक्रारींमुळे बालरुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचणे तसेच दूषित पाण्याचा पुरवठा होणे यामुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरणचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. एम. काळेल यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखणे, पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरणे आणि लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ताप, सर्दी, अंगदुखी किंवा डेंग्यूची लक्षणे जाणवल्यास आजार अंगावर न काढता तातडीने शासकीय किंवा खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार करावेत.
- डॉ. बी. एम. काळेल, वैद्यकीय अधीक्षक, उरण