

उरण : उरण परिसरात पावसाळी आजारांनी डोके वर काढले असून, डेंग्यू, मलेरिया, सर्दी, खोकला, अंगदुखी, काविळ आणि डोकेदुखीच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षीच्या जुलै-ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत यंदा या आजारांचे रुग्ण दुपटीने वाढल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
बेलपाडा गावात डेंग्यूचे अनेक रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक रुग्ण उपचारासाठी खासगी तसेच शासकीय रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे उरण परिसरात पावसाळी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
उरण परिसरातील बहुतांश ग्रामपंचायत हद्दीत पाणीपुरवठा दूषित होत असल्याने तसेच सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे आजारांना पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे.