

उरण परिसरातील नागरिकांना डिसेंबर महिन्यात आठवड्यातून दोन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) रानसई धरणातील घटती पाणीपातळी लक्षात घेऊन पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी पावसाळा लांबल्याने नोव्हेंबर महिन्यात पाणी कपातीपासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र रानसई धरणाची साठवण क्षमता मर्यादित असल्याने पावसाळ्यात लाखो लिटर पाणी वाहून गेले. परिणामी उरण शहराला आवश्यक असलेल्या दररोज ४१ दशलक्ष लिटरपैकी सध्या केवळ ३० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा शक्य होत आहे. दिवसभरात सुमारे १० दशलक्ष लिटर पाण्याची टंचाई जाणवते आहे.
यावर उपाय म्हणून उरणमध्ये प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार पाणीपुरवठ्यात कपात केली जाणार आहे. उपलब्ध पाणी जून २०२६ पर्यंत पुरेल, यासाठी ही तात्पुरती उपाययोजना असल्याचे एमआयडीसीने स्पष्ट केले आहे.
मुंबईतही पाणीकपात
मुंबईतील के पूर्व विभाग, एच पूर्व विभाग आणि जी उत्तर विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीची कामे हाती घेतली जाणार आहेत. ही कार्यवाही शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेपासून शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास सुरु राहणार आहे. परिणामी, के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर के पूर्व विभागात काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील विविध ठिकाणची १८०० मिलीमीटर व्यासाची तानसा पश्चिम जलवाहिनी, १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी, २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी आणि जी उत्तर विभागातील १५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी जोडणीचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. ही कामे शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपासून शनिवार, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण २४ तास सुरु राहणार आहे.
BMC कडून आवाहन
यासाठी के पूर्व, एच पूर्व व जी उत्तर विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून - गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.