

नवी मुंबई : मुंबईतील कुर्ला येथील रहिवासी असलेला मोहम्मद जुहेर शेख हा १८ वर्षीय तरुण कुटुंबाला न सांगता खोपोली येथील धोकादायक केपी धबधब्यावर गेला होता. मुसळधार पाऊस आणि निसरड्या वाटांवरून ३ तास ट्रेकिंग करून तो धबधब्याच्या उगमस्थानावर पोहोचला. तिथे सेल्फी आणि व्हिडिओ काढल्यानंतर परतताना तो खडकावरून घसरून पडला. यात त्याच्या हाताला दुखापत झाल्याने तो तिथेच अडकला.
जखमी अवस्थेत त्याने ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधून मदत मागितली. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन हिरे आणि हेल्प फाउंडेशनच्या पथकाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि पूरसदृश प्रवाहामुळे बचावकार्यात मोठे अडथळे आले. अखेर फोनवरील संपर्काच्या मदतीने त्याचा माग काढून त्याला सुखरूप खाली आणण्यात आले. पोलिसांनी त्याच्या कुटुंबाला पाचारण करून तरुणाचे समुपदेशन केले.