

मत आमचेही
ॲड. श्रीनिवास बिक्कड
‘जगातला सर्वात मोठा पक्ष’ असल्याची शेखी मिरवणारा भाजप महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची हिंमत दाखवू शकत नाही, हीच बाब या पक्षाच्या कथित संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उभी करते.
नाशिकमध्ये घडणाऱ्या घटना बदललेल्या राजकीय संस्कृतीचे जिवंत उदाहरण आहेत. इतर पक्षांतील नेते, नगरसेवक, पदाधिकारी यांना कोट्यवधी रुपयांची आमिषे देऊन भाजपमध्ये घेतले जात आहे. हा ‘पक्षप्रवेश’ नाही, तर उघडपणे चाललेली राजकीय खरेदी-विक्री आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या पक्षप्रवेश सोहळ्यांवेळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागत आहे. कारण वर्षानुवर्ष भाजपसाठी काम करणारे, पक्ष उभारणारे निष्ठावंत कार्यकर्ते या ‘मेगाभरती’ विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हा विरोध केवळ नाराजीचा नाही, तर भाजपच्या अंतर्गत लोकशाहीच्या आणि राजकीय नैतिकतेच्या मृत्यूचा आक्रोश आहे. भाजपच्या नेत्यांना मात्र हा आक्रोश ऐकू येत नाही. कारण आज भाजपमध्ये विचार नव्हे, व्यवहार महत्त्वाचा ठरला आहे. निष्ठा, संघर्ष, पक्षासाठी दिलेले आयुष्य याला कोणतीही किंमत उरलेली नाही. पैसा, सत्ता आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता एवढेच निकष उरले आहेत. या पक्ष प्रवेशानंतर भाजपच्या आमदार देवयांनी फरांदे यांचे डोळे पाणावलेल्या दृश्य वृत्तवाहिन्यांवरून पाहून याची प्रचिती भाजपच्या कार्यकर्त्यांना आली असेलच. ही स्थिती केवळ नाशिकपुरती मर्यादित नाही.
सोलापुरी निष्ठावंतांच्या वेदना
सोलापूर जिल्ह्यातील चित्र आणखी विदारक आहे. भाजपचे रोपटे ज्या लोकांनी लावले, वाढवले, ते सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख आज उघडपणे व्यथित आहेत. ‘आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळत नसेल, तर ते ज्या पक्षात जातील त्या पक्षाचा आम्ही प्रचार करू,’ असे विधान ही केवळ नाराजी नाही, तर भाजपच्या संघटनात्मक अपयशाची कबुली आहे. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य घालवले, त्यांनाच आज बाहेरचा रस्ता दाखवला जातोय आणि कालपरवापर्यंत भाजपविरोधात लढणाऱ्यांना आज तिकीट दिले जात आहे.
हा विरोधाभास अपघाती नाही, तर भाजपच्या राजकारणाची ठरलेली दिशा आहे. भाजपने राजकीय संस्कृती आणि सभ्यता मोडीत काढली आहे. विचारधारेला, कार्यकर्त्यांच्या भावनांना आणि लोकशाही मूल्यांना तिलांजली देऊन राजकारणाचा उघड व्यापार सुरू केला आहे. उमेदवारांची खरेदी, मतदारांना पैशांचे वाटप, पक्षांची अदलाबदल सगळं काही पैशाच्या जोरावर होत आहे. हे राजकारण नसून निव्वळ सत्तेचा बाजार आहे.
भाजपचे समर्थक यावर ‘राजकारणात सगळं चालतं’ हे ठोकळेबाज उत्तर देतात. पण हीच मानसिकता महाराष्ट्राच्या राजकीय अधःपतनाला कारणीभूत ठरत आहे. राजकारणात सगळं चालत असेल, तर नैतिकता, जबाबदारी, लोकशाही मूल्ये कशासाठी? सत्तेसाठी काहीही चालत असेल, तर मग गुन्हेगारी पार्श्वभूमी, भ्रष्टाचाराचे आरोप, कलंकित चारित्र्ये या गोष्टींना म्हणजे पर्यायाने नैतिकतेला काही अर्थच उरत नाही आणि नेमकं हेच भाजपच्या सत्ताकारणात दिसून येतं. पंतप्रधान स्वतः ज्या व्यक्तीवर ‘७० हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी’ असा आरोप करतात, त्याच व्यक्तीला भाजप सरकार उपमुख्यमंत्री करते. हा फक्त विरोधाभास नव्हे, तर भाजपची नैतिक दिवाळखोरी आहे. जनतेसमोर भ्रष्टाचाराविरोधात भाषणं करायची आणि सत्तेसाठी त्याच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेच्या सर्वोच्च खुर्च्यांवर बसवायचं हा दुटप्पीपणा महाराष्ट्र फक्त पाहत नाही तर अनुभवतोय.
महानगरपालिका निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. येथे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न असतो, कचरा व्यवस्थापन असतं, रस्ते, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यांसारखे थेट नागरिकांच्या जीवनाशी निगडित मुद्दे असतात. पण भाजपसाठी या निवडणुका लोकसेवेचं साधन नसून सत्ताविस्ताराचा प्रकल्प ठरल्या आहेत. त्यामुळेच स्थानिक कार्यकर्ते, शहराची जाण असलेले लोक बाजूला फेकले जातात आणि पैशाच्या जोरावर आलेले ‘आयातीत’ नेते पुढे केले जातात. भाजप सतत सांगतो की, आम्ही फार मोठे झालो आहोत, आमच्याशिवाय पर्याय नाही. पण महाराष्ट्रात जे घडत आहे ते याच्या नेमकं उलट आहे. भाजप मोठा होत नसून महाराष्ट्राची राजकीय जमीन पोखरत आहे. कार्यकर्त्यांचा अपमान, लोकशाही प्रक्रियेची थट्टा, पैशाला दिलेले अवाजवी महत्त्व यामुळे जनतेचा राजकारणावरचा विश्वास कमी होत आहे.
आज भाजप जिंकू शकतो, सत्ता मिळवू शकतो, पण या मार्गाने मिळवलेली सत्ता टिकाऊ नसते. कारण ती लोकांच्या विश्वासावर नाही, तर व्यवहारावर उभी असते आणि व्यवहार संपला की निष्ठा उरत नाही. भाजपने आज ज्या वेगाने इतर पक्षांतील लोकांना सामावून घेतले आहे, त्याच वेगाने उद्या हे लोक दुसऱ्या दिशेने जातील, हीच भाजपच्या राजकारणाची शोकांतिका आहे.
महानगरपालिका निवडणुका केवळ सत्तेचा खेळ नसून लोकशाहीची परीक्षा असते. या परीक्षेत भाजप नापास ठरत आहे. कारण इथे विचार नाही, मूल्य नाही, नैतिकता नाही, आहे ती फक्त पैशाच्या जोरावर अनैतिक मार्गाने मिळवलेली सत्ता. “जगातला सर्वात मोठा पक्ष” असल्याच्या गप्पा मारण्यात धन्यता मानणाऱ्या भाजपने हे लक्षात घ्यायला हवं की मोठेपणा आकड्यांत नसतो, तर आचार आणि विचारांत असतो. महाराष्ट्र भाजपकडे ना आचार आहे ना विचार!
विचारधारेचे दुर्मिळ चित्र
एकीकडे निवडणुकीतील उमेदवारी मिळवण्यासाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश करणाऱ्यांची रांग लागली आहे; काही ठिकाणी ही रांग चेंगराचेंगरीत बदलते आहे, सत्ता हीच सर्वकाही असल्याची मानसिकता पसरवली जात आहे. अशा वैचारिक अंधाराच्या काळात प्रशांत जगतापसारख्या तरुण राजकीय कार्यकर्त्याने शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यसंकल्पनेपासून शाहू महाराजांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांपर्यंत, महात्मा फुले यांच्या सत्य-समतेच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानवादी लोकशाहीच्या परंपरेला जागत, सत्तेपेक्षा विचारांना प्राधान्य देत काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेणं हे आजच्या राजकारणात दुर्मीळ पण लोकशाहीवाद्यांना बळ देणारे उदाहरण आहे. भाजपने नैतिकता आणि वैचारिक सातत्य केव्हाच सोडले असले, तरी राजकारण म्हणजे केवळ सत्ता हस्तगत करण्याचं साधन नसून समाजपरिवर्तनाची प्रक्रिया आहे, ही जाणीव अजूनही मोजक्या का होईना लोकांमध्ये जिवंत आहे, हे या निर्णयातून स्पष्ट होतं आणि म्हणूनच हा निर्णय पुरोगामी, विवेकवादी महाराष्ट्रासाठी आशेचा किरण ठरतो. मात्र याच पुण्यात, जिथे सामाजिक सुधारणांची आणि प्रबोधनाची परंपरा रुजलेली आहे, तिथे कुख्यात गुंड बंडू आंदेकर जेलमधून निवडणूक लढवत असून त्याला पोलीस बंदोबस्तात निवडणूक कार्यालयात आणण्याची दृश्यं समोर येतात, तेव्हा लोकशाहीची घसरण किती खोलवर गेली आहे याची तीव्र जाणीव होते; एका बाजूला विचारांसाठी सत्तेचा त्याग करणारा तरुण आणि दुसऱ्या बाजूला गुन्हेगारीला सत्तेच्या छत्राखाली दिलं जाणारं संरक्षण, हा विरोधाभासच आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची वैचारिक दिशा किती धोकादायक वळणावर आली आहे हे अधोरेखित करतो.
माध्यम समन्वयक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी