दार उघड बये, दार उघड...

विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय मिळालेला नाही. न्यायालयात जाऊनही तारखांवर तारखाच पडत आहेत. राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, तोतयेगिरी सुरू आहे, महिलांवरच्या अत्याचाराने कळस गाठला आहे. म्हणूनच उबाठा शिवसेनेच्या प्रचारगीतातून जगदंबेला साकडे घालण्यात आले आहे.
दार उघड बये, दार उघड...
Published on

मत आमचेही

- ॲड. हर्षल प्रधान

विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. अजूनही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला न्याय मिळालेला नाही. न्यायालयात जाऊनही तारखांवर तारखाच पडत आहेत. राज्यात घटनाबाह्य सरकार आहे, तोतयेगिरी सुरू आहे, महिलांवरच्या अत्याचाराने कळस गाठला आहे. म्हणूनच उबाठा शिवसेनेच्या प्रचारगीतातून जगदंबेला साकडे घालण्यात आले आहे. आदिमाया हे साकडे नक्की ऐकेल, अशी मराठीजनांची खात्री आहे.

दार उघड बये, दार उघड

शंखनाद होऊ दे

नादघोष गर्जू दे विशाल

धगधगती पेटू दे मशाल...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एक प्रचारगीत महाराष्ट्राच्या जनतेला बहाल करण्यात आले. नवरात्रीच्या मंगल दिवसांच्या कालावधीत आदिमायेला आवाहन करत असुरांचा संहार करायला तुझी मशाल हाती दे, असे साकडे घालत ‘दार उघड बये, दार उघड’ अशी आर्त हाक या गीतातून आदिमायेला घालण्यात आली आहे. या निमित्ताने राज्यात आणि देशात कसे राजकीय असुर भस्मासुर होऊ पाहत आहेत आणि हे दुष्ट इतके मातले आहेत की त्यांचे मर्दन करण्यासाठी आई भवानी आता तुझी मशाल हाती दे, असे आर्जव करण्यात आले आहे. शिवसेनेच्या गीतांचा आणि त्यांचा महाराष्ट्रातील मराठी माणसांवर पडणाऱ्या प्रभावाचा इतिहास मोठा रोचक आहे. शिवसेनेची ही गाणी कायम मराठी मनाला भुरळ घालत आली आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच गोंधळ गीताच्या अनावरण प्रसंगी आपली भावना व्यक्त केली. “गेली दोन-अडीच वर्षं आम्ही न्याय मंदिराची दारे ठोठावत आहोत. न्याय देवतेवर विश्वास आहे. न्याय मिळत नाही म्हणून जगदंबेलाच साकडे घातले की, तू तरी दार उघड. आता जनतेच्या न्यायालयात जात आहोत. राज्यात तोतयेगिरी सुरू आहे. महिलांवर अत्याचार सुरू आहे. घटनाबाह्य सरकार आहे. मला खात्री आहेच की मनापासून जगदंबेला हाक मारल्यावर ती धावून येतेच. आम्हाला जगदंबेकडूनच न्याय मिळेल. राज्यात सध्या अराजक माजलं आहे. त्यामुळे आम्ही अराजकीय गाणं आणलं आहे.”, असे म्हणत त्यांनी आपली भूमिका मांडली.

दार उघड बये, दार उघड...

सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये

आदिमाये तू ये... आदिशक्ती तू ये...

असुरांचा संहार कराया मशाल हाती दे

दुष्ट मातले फार तयांचे मर्दन करण्या ये

अत्याचारी दैत्यांपासून अभय आम्हाला दे

पाप वाढले घोर... जाळण्या मशाल हाती दे

सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये

धारदार तलवार हाती घे भवानी बनूनी ये

महिषासुर मारून टाकण्या दुर्गा बनूनी ये

शुंभ निशुंभ विनाश करण्या जगदंबे तू ये

पाप वाढले घोर जाळण्या मशाल हाती दे

सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये

स्त्रीची अब्रू लुटणारे ते दैत्य माजले आता

मायभगिनींना कुणी न उरला वाचविणारा त्राता

होऊनिया रणचंडिका तू रक्षण करण्या ये

असुरांचा संहार कराया मशाल हाती दे

सत्वर भूवरी ये गं अंबे सत्वर भूवरी ये..

असे या गीताचे बोल आहेत. राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून शिवसेनेच्या फुटीर आमदारांना भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी आपल्या मांडीवर बसवून वाममार्गाने त्यांच्या हातात शिवसेनेचे अधिकृत नाव आणि चिन्ह सुपूर्द केले आहे. निवडणूक आयोग ते सर्वोच्च न्यायालयात दाद मागूनही काही होत नाही. त्यामुळे आता जनतेच्या दरबारात जाणे आणि न्याय मागणे हाच पर्याय आहे. शिवसेनेच्या या गीतामुळे हा न्याय जनता देईल असा विश्वास व्यक्त करायला हरकत नाही. यापूर्वी लोकसभा निवडणुकीतही शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने महाराष्ट्रात भाजपप्रणित एनडीएला चांगलेच अडचणीत आणले होते. ४८ लोकसभा खासदारांपैकी महाविकास आघाडीच्या ३१ खासदारांना निवडून देऊन महाराष्ट्राने एकप्रकारे भाजप आणि मोदी यांना नाकारले होते. विधानसभा निवडणुकीतही भाजपप्रणित बंडखोर पक्षांच्या आघाडीला जनता घरचा रस्ता दाखवेल यात शंका नाही.

जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना...

शिवसेना प्रचार गीतांना एक इतिहास आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजकीय पक्ष काढतानाच कलावंताचे मनही जोपासले आणि प्रत्येक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताल धरायला लावणारी गाणी निर्माण करायला लावली. त्यांच्या काळातले, “आभाळ फाटलंय शिवायला दोरा मिळायचा नाय” हे गाणे त्या काळात विशेष गाजले होते. बाळासाहेबांचा वारसा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याच कलावंत मनाने जपत आहेत. उद्धव ठाकरे यांनी पक्षाची जबाबदारी हाती घेतल्यावर सगळ्यात महत्त्वाचे गाणे तयार करवून घेतले होते ते अवधूत गुप्ते यांच्याकडून. आजही शिवसेनेच्या कोणत्याही कार्यक्रमात किंवा अगदी गणपती-नवरात्र उत्सवात हे गाणे आवर्जून वाजवले जाते आणि त्यावर सामान्य माणसाकडून ताल आणि ठेका धरला जातो.

“जात, गोत्र अन‌् धर्म आमुचा शिवसेना…

आम्ही शिवाचे सैनिक वेडे, करू जीवाचे रान…

पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान।

आमचा हिंदुस्थान, आमचा हिंदुस्थान।

भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा…

जात, गोत्र अन‌् धर्म आमुचा शिवसेना। शिवसेना ॥

वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास

खड्ग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास

लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास।

महाराष्ट्र धर्म वाढवा… सांगतो शिवबांचा इतिहास॥

बस पुरे आता ना होऊनी देऊ माणुसकीची दैना,

जात, गोत्र अन‌् धर्म आमुचा शिवसेना। शिवसेना॥

धगधगता अग्नी चहूकडे अन‌् मार्ग निखाऱ्यांचा

जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा

अरे हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा ‘भेकडांचा’

वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा

घडवून दावू आम्ही जे कोणास कधी जमले ना

जात, गोत्र अन‌् धर्म आमुचा शिवसेना। शिवसेना ॥”

अवधूत गुप्ते यांच्या आवाजातील हे गीत आजही आबालवृद्धांच्या गळ्यातला ताईत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठीही उद्धव ठाकरे यांच्यामार्फत असेच एक नवीन गाणे मशाल गीत म्हणून प्रचारात आणले गेले होते.

शंखनाद होऊ दे, रणदुदंभी वाजू दे

नादघोष गर्जू दे विशाल

दुष्टशक्ती जाळण्या, मार्ग स्पष्ट दावण्या

धगधगती पेटू दे मशाल...

असे त्या गाण्याचे बोल होते. ‘हिंदू हा तुझाच धर्म, जाणून घे तुझेच कर्म..’ अशा त्या गाण्यांच्या पुढील काही ओळी होत्या ज्यावर भाजपकडून आक्षेपही घेण्यात आला होता. मात्र तो गाण्याच्या लोकप्रियतेपुढे फार काळ टिकला नाही. शिवसेनेने यापूर्वी ‘तेजाचा वारसा आम्हाला त्याच बळावर चालू वाट’, ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘पक्ष आमचा ठाकरे, चिन्ह आमचे ठाकरे’ अशी अनेक गाणी वेळोवेळी निवडणुकीची प्रचार गीते म्हणून मराठी माणसांच्या मनात आणि हृदयात बिंबवली आहेत. ‘सत्वर भुवरी ये’ या गोंधळ गीताच्या निमित्ताने त्या सगळ्या गाण्यांची आणि त्यांच्या मागील निर्मिती प्रक्रियेची आठवण झाली. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिमाया शिवसेनेचे हे साकडे नक्की ऐकेल आणि न्याय मंदिराचे दार उघडेल याची खात्री आहे.

(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

logo
marathi.freepressjournal.in