आत्महत्या की हत्या?

संपदा आणि गौरी या दोघीही उच्चशिक्षित होत्या, स्वावलंबी होत्या, तरीही त्यांना सामाजिक दबाव आणि छळाला तोंड द्यावे लागले. हे प्रकरण फक्त दोन महिलांचे नसून, संपूर्ण समाजाचे आहे. खून की आत्महत्या? हे उत्तर शोधण्यासाठी निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.
आत्महत्या की हत्या?
Published on

कोर्टाच्या आवारातून

ॲड. विवेक ठाकरे

संपदा आणि गौरी या दोघीही उच्चशिक्षित होत्या, स्वावलंबी होत्या, तरीही त्यांना सामाजिक दबाव आणि छळाला तोंड द्यावे लागले. हे प्रकरण फक्त दोन महिलांचे नसून, संपूर्ण समाजाचे आहे. खून की आत्महत्या? हे उत्तर शोधण्यासाठी निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.

बीडमधीलच पण फलटणमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले असताना आता गौरी पालवे-गर्जे या आणखी एका डॉक्टर असणाऱ्या विवाहितेने आत्महत्या केली आहे. त्यालाही पार्श्वभूमी राजकीयच आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरचा पती अनंत गर्जे हा मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय्य सहाय्यक आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे कधीकाळी महिला आणि बालविकास मंत्री होत्या. डॉ. संपदा मुंडे प्रकरणात पोलिसांचा आणि राजकीय मंडळींचा आपल्या मनानुसार काम करण्यासाठी असलेला प्रचंड दबाव आणि हम करें सो कायदा अशी मानसिकता होती. डॉ. गौरी प्रकरणात मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय्य सहाय्यकाची वादग्रस्त प्रकरणेच नव्हे, तर सत्तेचा माज आणि आपले काहीही वाकडे होऊ शकत नाही हीच मानसिकता होती. सत्तेच्या वर्तुळातून आलेल्या अहंकारातून दोन्ही तरुणींचा झालेला प्रचंड मानसिक व शारीरिक छळ हा आत्म-हत्येस प्रवृत्त करणारा होता. त्यामुळे याचा हत्येच्या अनुषंगाने तपास करायचा की आत्महत्या सांगून प्रकरण दाबून टाकायचे याचा न्यायाच्या नीतीने विचार व्हावा. गेले काही महिने महाराष्ट्रात रक्तरंजित उद्रेक सुरू आहे. कुठे कोयता गँगची दहशत, तर कुठे खंडणी, लूटमार, हत्या त्यांचे सत्र, तर कुठे आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. या सर्वांमधील समान धागा आहे तो सत्तेचा आणि पैशाचा माज. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश वाटावा अशी ही परिस्थिती. सामाजिक, राजकीय सगळ्या वीण उसवून गेल्या आहेत. यातच बीड जिल्ह्यातीलच डॉक्टर महिलेची ही दुसरी अशीच वादग्रस्त आत्महत्या घडलीय ज्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे या खरंच आत्महत्या आहेत की संस्थात्मक खून वा हत्या आहेत, असा प्रश्न उभा राहिला आहे.

अवघ्या नऊ महिन्यांपूर्वी डॉ. गौरी यांचे लग्न अनंत गर्जे याच्याबरोबर झाले होते. बीड जिल्ह्यातील मोठे प्रस्त असणाऱ्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय्य सहाय्यक असल्याच्या प्रतिष्ठेतूनच हा विवाह झाला होता.

तिच्या वडिलांनीही हे मान्य केले आहे. त्या मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये दंतचिकित्सक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. गौरी यांच्या आत्महत्येची घटना २२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वरळी येथील त्याच्या निवासस्थानी घडली. मात्र, कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, ही केवळ आत्महत्या नसून, मानसिक त्रास आणि छळामुळे घडलेला खून असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी या आत्महत्येवरही संशय व्यक्त केला आहे. आमची मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. तिची हत्या करण्यात आली आहे, असे कुटुंबाचे म्हणणे आहे. वरळी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, गौरीचे वडील रामराव पालवे यांनी सांगितले की, अनंत गर्जे यांनी लग्नानंतर गौरीवर कौटुंबिक आणि आर्थिक दबाव टाकला. अनंतकडून सतत अपमानास्पद शब्द वापरले जात, तिच्या नोकरीबद्दल आणि कुटुंबाबद्दल टोमणे मारले जात. याशिवाय, अनंताचे भाऊ आणि बहीण यांच्याकडूनही छळ होत होता. गौरीला अनंतच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्याबद्दल विचारले असता, त्याच्या वागण्याबद्दल विचारले असता, त्याने उलट गौरीलाच ‘मी आत्महत्या करेन आणि तुझीच चूक ठरवेन’, अशी धमकी दिली होती.

या घटनेनंतर पोलिसांनी कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल) अंतर्गत गुन्हा दाखल करून अनंत गर्जेला अटक केली आहे. या गुन्ह्याचा हत्येच्या अनुषंगानेही निपक्ष तपास व्हायला हवा. कारण अनंत गर्जेच्या दाव्यानुसार घटना घडल्यानंतर ज्या तिसाव्या मजल्यावरील घरात बाल्कनीतून त्याने घरात प्रवेश केला त्या बाल्कनीचे गजही वाकलेले नाहीत. कोणीही नसताना पोलिसांशिवाय बॉडी उतरवून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा प्रकार पुरावे नष्ट करणारा आहे. पोलिसांनी या सगळ्या प्रकाराचा निष्पक्ष तपास करणे आवश्यक आहे. तरच न्यायालयात हे प्रकरण टिकून मृतास न्याय मिळेल.

आत्महत्या केली तेव्हा संपदाने तळहातावर त्रास देणाऱ्यांची नावे लिहिली होती. तसेच त्याआधी आपल्यावर चुकीची कामे करण्यासाठी दबाव टाकणाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे केली होती. पण त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. या दोन्ही घटनांमुळे बीड आणि महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बीड हा जिल्हा आधीच कौटुंबिक हिंसेसाठी कुप्रसिद्ध आहे. २०२४ च्या राष्ट्रीय गुन्हे नोंद अहवालानुसार, महाराष्ट्रात दरवर्षी १०,००० हून अधिक कौटुंबिक हिंसेच्या तक्रारी दाखल होतात, यातील ३० टक्के बीडसारख्या ग्रामीण भागातील आहेत. डॉक्टरांसारख्या व्यावसायिक महिलांवर होणारा त्रास हा अधिक गंभीर आहे. संपदा आणि गौरी या दोघीही उच्चशिक्षित होत्या, स्वावलंबी होत्या, तरीही त्यांना सामाजिक दबाव आणि छळाला तोंड द्यावे लागले. हे प्रकरण फक्त दोन महिलांचे नसून, संपूर्ण समाजाचे आहे. खून की आत्महत्या? हे उत्तर शोधण्यासाठी निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.

अन्यथा, अशा घटना सतत घडत राहतील. सरकारने तत्काळ पावले उचलून या घटनांतील दोषींवर कडक कारवाई करत वेळीच पायबंद घालायला हवा.. तरच भविष्यात या “आत्म-हत्यांना” चाप बसेल.

मुंबई उच्च न्यायालयाचे वकील

logo
marathi.freepressjournal.in